औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वीजगळती रोखण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात, असे असले तरी वीजगळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे महावितरणने राज्यात धडक मोहीम हाती घेतली असून 2021-22 दरम्यान उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये 22 हजार 987 ठिकाणी धाडी टाकत 371 कोटी 45 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.यापैकी 172 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
वीजचोरी रोखण्यासाठी राज्यात परिमंडल स्तरावर 8, मंडल स्तरावर 20 तर विभागीय स्तरावर 40 अशी 71 पथके असून, यांत सुमारे 345 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या पथकाने वीजचोरीच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणार्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. या पथकाने 2021- 22 मध्ये सर्वाधिक 557.53 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड केली आहे. याआधी जास्तीत जास्त 168 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड करण्याचा या पथकांचा विक्रम होता, परंतु त्यापेक्षा तिप्पट वीजचोरी उघड करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे वीजचोरीच्या विविध तांत्रिक क्लृप्त्या, तसेच स्मार्ट पद्धतीचा अभ्यास करून, त्यावर महिन्याच्या पहिल्या व तिसर्या सोमवारी विभागांतर्गत चर्चा करून त्यावर उपाययोजना निश्चित करण्यात येते. त्यामुळे राज्यात वीजचोरीविरुद्ध प्रभावी व कठोर मोहिमा राबविण्याचे सत्र सुरू झाले आहे. वीजचोरीच्या विविध प्रकारांसोबतच तपासणीदरम्यान भरारी पथकांना सुमारे 35 ते 40 प्रकारच्या अनियमितता देसून येत आहेत. त्या नियमित करून महावितरणचा महसूलदेखील वाढविण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
भरारी पथकाने केलेल्या कारवाईत कोकण प्रादेशिक विभागात सर्वांत जास्त वीजचोरी उघडकीस आली आहे. या विभागात 7834 ठिकाणी 152 कोटी 43 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. त्यापाठोपाठ पुणे प्रादेशिक 5527 ठिकाणी 72 कोटी, नागपूर प्रादेशिक 5503 ठिकाणी 63 कोटी 23 लाख आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 4123 ठिकाणी 29 कोटी 80 लाख रुपयांची वीजचोरी उघड केली आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू असलेली स्मार्ट चोरीही उघडकीस आणण्यात आली आहे.