

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊसदेखील बरसला नसल्याने शेतीची कामे रखडली आहेत. जून महिना अर्धा झाला असला तरी पाऊस पडत नसल्याने परिसरात पेरण्या खोळंबल्या असून, पाणी टंचाईत वाढ झाली आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाकळवाडी, गोसासी, जऊळके बुद्रुक, वाफगाव, पूर, कनेरसर, वरुडे, चिंचबाईगाव, गाडकवाडी, चौधरवाडी ही गावे अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. दरवर्षी या भागात कमी प्रमाणात पाऊस पडतो. गेल्या वर्षीदेखील येथे पुरेसा पाऊस झाला नाही. यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने या भागात हुलकावणी दिली व आता जून महिना अर्धा झाला तरी पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. पाऊस नसल्याने शेतातील ढेकळे फुटली नाहीत. परिणामी शेतीची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाअभावी या भागातील पाणी टंचाई वाढली आहे. शासनाच्या वतीने सुरू झालेले पाणी टँकरच्या फेर्या वाढवण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पाऊस पडत नसल्याने जनावरांच्या पाण्याचा व चार्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हेही वाचा