त्र्यंबकेश्वर मंदिरात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत योग दिन : ना. पवारांनी घेतला आढावा | पुढारी

त्र्यंबकेश्वर मंदिरात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत योग दिन : ना. पवारांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत मंगळवारी (दि.21) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिन कार्यक्रमासाठी 150 नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच ना. अमित शाह हे नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे या दौर्‍याच्या तयारीसंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी (दि.16) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुंबई येथील केंद्रीय राखीव दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशातील 75 ऐतिहासिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत योगदिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ना. शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे डॉ. पवार यांनी सूचित केले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमस्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. योगा कार्यक्रमानंतर दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राच्या रुग्णालयाच्या कोनशिलेचे अनावरण ना. शाह यांच्या हस्ते होणार आहे. दौर्‍याच्या तयारीच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून, त्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नेमणूक केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली.

असा असेल कार्यक्रम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सोमवारी (दि.20) नाशिक शहरात आगमन होईल. त्यानंतर र्त्यंबकेश्वर येथे मंगळवारी (दि.21) पहाटे 5.45 ते 6.30 यावेळेत ना. शाह हे नागरिकांना संबोधित करतील. तर 6.30 ते 7 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन प्रणालीद्वारे देशाला मार्गदर्शन करणार आहेत. सात ते पावणेआठ यावेळेत प्रत्यक्ष योगाचे सादरीकरण होईल. ना. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 10.30 ते साडेबारा यावेळेत गुरुपीठ रुग्णालय कोनशिलेचा कार्यक्रम पार पडेल. दुपारनंतर भाजपच्या मोजक्या कार्यकर्त्यांना शाह हे संबोधित करतील.

हेही वाचा :

Back to top button