

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या गुन्ह्यासंदर्भात तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी वड्डी (ता. मिरज) येथील पाच महिलांना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले.
रेखा जगेश उर्फ कलीयुग भोसले, छायाक्का सुनील भोसले, जानकी गौडा भोसले, मनीषा पाटील- भोसले व छोटा उर्फ छाया ऋषिकेश पवार ( सर्वजण रा. वड्डी, ता. मिरज ) अशी आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी-मल्लेवाडी (ता. मिरज) येथे दरोडा पडला होता. दि. 11 जानेवारी 2019 रोजी या दरोड्याच्या तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक वड्डी गावी गेले होते. त्यावेळी या महिलांनी जमाव जमवून पोलिस पथकावर हल्ला केला होता. यामध्ये किशोर कदम व विनोद कदम हे दोन पोलिस जखमी झाले होते. याप्रकरणी किशोर कदम यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.पी. तळपे यांनी तपास करून पाच महिला विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने उपलब्ध साक्षी पुराव्यावरून या पाच महिलांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे हवालदार एस. व्ही. साळुंखे यांनी मदत केली.