केळी महागली; उत्पादनात घट व निर्यातीत वाढ झाल्याचा परिणाम

केळी महागली; उत्पादनात घट व निर्यातीत वाढ झाल्याचा परिणाम
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: लॉकडाऊन काळात मागणीअभावी केळीला कमी दर मिळाल्यामुळे शहराला मोठ्या प्रमाणात केळीचा पुरवठा करणार्‍या भागात केळीच्या लागवडीत मोठी घट झाली. दरम्यान, दर्जेदार केळींच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मार्केट यार्डात आवक कमी व मागणी जास्त आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात केळीच्या डझनाचे दर 50 ते 60 रुपयांवर गेले आहेत. लॉकडाऊनपूर्वी लागवडी चांगल्या झाल्याने केळीचे उत्पादनही चांगले झाले होते.

मात्र, लॉकडाऊन काळात बाजारपेठांच्या चालू-बंद परिस्थितीमुळे केळींना अपेक्षेएवढी मागणी राहिली नाही. परिणामी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात केळीच्या किलोला तीन ते सहा रुपये दर मिळाला. कोरोना व लॉकडाऊन परिस्थिती कधीपर्यंत राहील, याची शाश्वती नसल्याने शेतकर्‍यांनी नवीन लागवडी केल्या नाहीत. त्यानंतर मात्र बाजारपेठा सुरळीत होऊन केळीला मागणी वाढू लागली.

मागणीच्या तुलेत उत्पादन कमीच राहिले. याखेरीज दर्जेदार केळींच्या निर्यातीतही वाढ होऊ लागली. परिणामी घाऊक बाजारात केळींच्या किलोचे भाव 16 ते 22 रुपयांपर्यंत पोहोचले. एरवी हेच दर सरासरी 8 ते 12 रुपयांपर्यंत असतात. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारातही केळींच्या दरात वाढ होऊन त्याचे भाव 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचले.

तमिळनाडूतील केळींवर वाहतूक खर्चाचा भार
मार्केट यार्डात कर्नाटक, तमिळनाडू येथून सोनकेळी बाजारात दाखल होत आहेत. यंदा या दोन्ही राज्यांमध्ये केळीचे उत्पादन चांगले आहे. मात्र, वाहतूक खर्चात वाढ झाल्याने याही केळींचे भाव वधारले आहेत.
इंधन दरात वाढ झाल्याने परराज्यातून येणार्‍या प्रत्येक गाडीमागे दहा ते पंधरा हजार रुपयांची वाढ झाली आहे. येथील केळींना देशभरातून चांगली मागणी आहे. परिणामी केळीचा भाव जागेवरच 63 ते 66 रुपये किलोवर गेला आहे. एरवी हे दर सरासरी 40 ते 50 रुपये एवढे असतात.

लॉकडाऊन काळात फक्त दर्जेदार केळीला मागणी राहिली, कारण त्यांचे दरही कमी होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी लागवड कमी केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन ते चार महिने ही परिस्थिती राहील. यापूर्वीही केळीला असे दर मिळाले आहेत. मात्र, जास्त काळ हे दर कायम राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अनिकेत वायकर, केळी व्यापारी.

गावरान केळी, सोनकेळी

आवक
21 ते 25 वाहने
(दररोज)

कोठून
पुणे (सोलापूर, अकलूज, इंदापूर), कर्नाटक, तमिळनाडू

घाऊक दर
16 ते 66 रुपये
(प्रतिकिलो)

किरकोळ दर
50 ते 60 रुपये
(प्रतिडझन)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news