

धायरी : पुढारी वृत्तसेवा
5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'पुणे महानगरपालिका प्लॉगेथॉन 2022' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम नर्हे आरोग्य कोठी यांच्या वतीने घेण्यात आला. पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता नकुसा ढोले पाटील यांनी स्वतः रस्त्यावर असलेला कचरा गोळा करून उपक्रमाचा शुभारंभ केला.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अंतर्गत नर्हे संपर्क कार्यालय ते बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंतच्या रस्त्यावरील 250 किलो प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला.
तसेच, माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. या उपक्रमाचे संयोजन मुकादम सुहास चौरे व अप्पा साठे यांनी केले. या वेळी काशीबाई नेवले इंजिनिअरिंग कॉलेज एनएसएस गटाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
हेही वाचा