

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह याची विशेष न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आफताब याच्या समाजमाध्यमातील खात्याच्या माहितीचे विश्लेषण केले जात असून, या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे, असे एटीएसमार्फत न्यायालयात सांगण्यात आले.
आफताबच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, साक्षीदारांचा जबाब नोंदविला जात आहे. आफताबच्या समाजमाध्यम खात्याच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे, तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी आफताबला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी 'एटीएस'तर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात केली. बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आफताबला न्यायालयीन कोठडी सुनावली.
देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी 'लष्कर-ए-तैयबा'शी संपर्कात असल्याच्या संशयावरून 'एटीएस'ने दापोडी येथून जुनैद महंमद अता महंमद (वय 28, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा) याला यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर 2 जून रोजी जुनैदचा साथीदार असल्याच्या संशयावरून आफताब शाहला 'एटीएस'ने जेरबंद केले. त्यानंतर 'एटीएस'ने या प्रकरणात इनामूल हक ऊर्फ इनामुल इम्तियाज (वय 19, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि महंमद युसूफ महंमद शाबान अत्तू (वय 31, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. दोडा, जम्मू-काश्मीर) या दोन संशयित तरुणांनाही अटक केली आहे.
हेही वाचा