

पुणे: शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे हा निरामय आरोग्याचा एक महत्त्वाचा निकष आहे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या काळात शारीरिक तंदुरुस्तीकडे अनेकांचे दुर्लक्ष होते आणि त्यातून विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाइन शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या ‘फिट कर्मचारी - सक्षम प्रशासन’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषद प्रशासन व ॲथ्लेक्स इनोव्हेशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने फिटनेस टेस्ट शिबिराचे आयोजन केले आहे. यात ऑनलाईन पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यात 6 प्रकारची तपासणी केली जाणार आहे.
डॉ. मापारी यांनी फिटनेस टेस्टची रचना, मोजमाप पद्धती व आरोग्यविषयक दक्षता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी अशा फिटनेस शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता व संपत्ती वृद्धीविषयक मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन, दीर्घकालीन बचत, जोखीम व्यवस्थापन आणि कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. आयसीआयसीआय बँकेच्या भावना व आशुतोष सरदेसाई यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आर्थिक साक्षरता व बचतीशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
निरोगी जीवनशैली मुख्य उद्देश
जि. प.चे सीईओ गजानन पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वर्गात शारीरिक तंदुरुस्ती, निरोगी जीवनशैली व कार्यक्षम प्रशासकीय व्यवस्थेची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.