

बावडा: मकाला गेली सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून हमीभावापेक्षा सुमारे तब्बल 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल कमी भाव मिळत आहे. याकडे सध्या राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. मात्र, मक्याला हमीभाव मिळत नसला तरी सध्या इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामात मकाची पेरणी जोरात सुरू आहे. शासनाचा मक्याचा हमीभाव (एमएसपी) हा प्रति क्विंटल 2400 रुपये आहे. मात्र, गेली काही महिन्यांपासून मकाला सरासरी 1850 ते 1900 रुपये असा कमी भाव मिळत आहे. परिणामी, मका उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सध्या खरीप हंगामातील मकापिकाची काढणी व मळणीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. गेली काही महिन्यांपासून खरीप हंगामातील उत्पादित झालेली मका ही शेतकरी वर्ग बाजारामध्ये विक्रीसाठी आणत आहे. परिणामी, बाजारात मकाची आवक वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मकाच्या हमीभावापेक्षा कमी भावाने प्रतिक्विंटल 1850 ते 1900 रुपये भावाने मकाविक्री करावी लागत आहे. बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी केली जात आहे. मकाचा हमीभाव आणि प्रत्यक्ष मिळणारा बाजारभाव यातील मोठ्या रक्कमेच्या तफावतीमुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी, सध्या मका उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत मका उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मकाची पेरणी केली आहे. अनेक ठिकाणी मकाचे पीक चांगले उगवूनही आले आहे. पिकाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. अजूनही मकापिकाची पेरणी सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे पेरणी यंत्राने बी व रासायनिक खतासह एकत्रितरीत्या पेरणी केली जात असल्याचे निरा-भीमा कारखान्याचे संचालक वसंतराव नाईक (लाखेवाडी), प्रगतशील शेतकरी नवनाथ पवार (बावडा), प्रा. प्रकाश घोगरे (सुरवड) प्रा. विराज मोहिते (टणू) यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना अवघ्या 4 महिन्यांमध्ये हमखास उत्पन्न देणारे व बाजारामध्ये चांगला हमीभाव मिळणारे पीक म्हणून मकाची ओळख आहे. सध्या जमिनीच्या पाण्याची पातळी चांगली असल्याने, मकापिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मकाचे उत्पादन भरघोस निघण्याची शक्यता आहे. यामुळे जनावरांनाही चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती निरा- भीमा कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत भोसले (रेडणी), विलासराव ताटे देशमुख (निरा नरसिंहपूर ), रमजान शेख व अमीर सय्यद (बावडा), राजाभाऊ ढुके (भांडगाव) यांनी दिली.
वर्षभरात मकाचे पीक घेतले जाते. या पिकाने शेतकरी वर्गाला गेली तीन-चार दशकांपासून मोठा आर्थिक आधार दिला आहे. दरम्यान, सध्या मकाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असला तरीही आगामी काळात रब्बी हंगामातील उत्पादित होणाऱ्या मकाला चांगला भाव मिळेल, असा आशावाद शेतकरी बाळगून आहेत.