

टाकळी भीमा: शिरूर तालुक्याच्या अनेक गावात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गांजाची विक्री होत असल्याचे समजते. नशिले पान आणि इतर अंमलीपदार्थ यांची विक्री होत आहे. बेरोजगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण शोधून त्यांना कमी श्रमात जास्त पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून या धंद्यात ओढले जात आहे. परिणामी तरुण आणि शाळकरी मुले या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. गांजा आणि इतर नशिले पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गांजाचे पाणी मारलेल्या पानांची विक्री हे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापेमारी करत दुकानदारांना पकडले. अलीकडील एक-दोन वर्षात या परिसरात गांजा व इतर नशिले अंमलीपदार्थांचे व्यसन वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विक्री आणि प्रसारासाठी बेरोजगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण शोधून त्यांना कमी श्रमात जास्त पैसे कमवण्याचा मार्ग मिळून या धंद्यात ओढले जात आहे. कमी श्रमात जास्त पैसे मिळतात, जास्त कष्ट करावे लागत नाही, या मानसिकतेतून तरुण वर्ग यामध्ये भरकटत चालला आहे. तरुणांसह शाळकरी मुले या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
अतिसेवन करणाऱ्या तरुणांमध्ये चक्कर येणे, फिट येणे, लक्षात न राहणे, बोलताना जीभ अडखळणे असे परिणाम दिसून येत असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. व्यसनाच्या धुंदीत असताना त्यांच्या हातून नकळत गुन्हे घडण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. रस्त्यावरून जाताना ओळख नसतानासुद्धा माझ्याकडे का पाहतोस, गाडी घासली, गाडी माझ्या पुढे का घातली यासाठी सामान्य माणसाला मार खावा लागत आहे.
रात्री-अपरात्री शेतातील पीक पेटवून देणे, घरासमोरील शेतावरील खोड्या करणे यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. बाहेरगावच्या लोकांनाही प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्याबरोबर भुरट्या चोऱ्या, केबलचोरी, मोटारचोरी, गाडीतील डिझेल काढणे, किरकोळ कारणासाठी मारहाण करणे, मुलींची छेडछाड, किरकोळ कारणातून टोकाची भांडणे होणे अशा घटना घडण्यामधे वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत असून सामाजिक परिस्थिती बिघडत आहे.
हे नशिले पदार्थ खाऊन तरुण युवक असे प्रकार करत असल्याची चर्चा आहे. नशा डोक्यात असल्याने यामुळे हे सहसा कुणाला घाबरत नाही. परिसरातील पालक वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींना जबाबदार कोण असा प्रश्नही सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे गांजासह नशिले पदार्थ विक्रेत्यांची तालुक्यातील पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.