

निमोणे: गाव गाड्यांच्या राजकारणात माना-पानाचं ठिकाण म्हणजे गावचा सरपंच, उपसरपंच किंवा सोसायटीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण किती दिवस सरपंच राहिला, चेअरमन राहिला यापेक्षा तो सरपंच झाला या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आल्याने आपलं नाव बोर्डावर लागावा यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास चालू असतो.
आतापर्यंतच्या निवडणुकीत एस.सी., एस.टी.चे आरक्षण वगळता गावगाड्यांच्या राजकारणावर मांड ठोकणारी मंडळी बहुतांशी मोठ्या भावकीतील किंवा पाहुणेरावळ्यांच्या गोतावळ्यातील असल्यामुळे पॅनेल उभं करण्यापासून तर सत्ता स्वतःकडे राखण्यापर्यंत कधी उजेडात, तर कधी अंधारात कोण कोणाला कसा शब्द देईल याचा काही थांगपत्ता दुसऱ्याला नसतो.
सत्ता आपली आली की काही दिवस मला सरपंच करा किंवा मला चेअरमन करा, त्याच्यानंतर मला त्या पदात काही इंटरेस्ट नाही. माझ्यानंतर तुम्हीच अशा पद्धतीने शाब्दिक पेरणी करून अनेकांना आश्वासन देऊन जोड्या जुळवून गावगाड्यावर मांड ठोकणाऱ्या मुरब्बी राजकारणी वेळ साधून निघल्यानंतर दिलेला शब्द पाळतील असं नसतं.
शिरूर तालुक्यातील जवळजवळ 90 टक्के ग््राामपंचायतींचा कार्यकाल हा संपत आला आहे. यापुढे होणाऱ्या ग््राामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांमधून सरपंचपद हे थेट जनतेतून असल्याने भविष्यकाळात काही दिवस तुला आणि काही दिवस मला हा पायंडा मोडीत निघणार आहे, त्यामुळे बाकी काही हो आपलं नाव बोर्डावर लागले पाहिजे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्यात, बरं गावगाड्यात सगळ्यांचाच इतिहास भूगोल सगळ्यांना माहीत असतो, मतलबा पुरती बांधील की मानणारा वर्ग हा गावगाड्यात झुंडशाहीच्या जोरावर अनेकदा वरचढ ठरतो. मात्र, तो दीर्घकाळ आपलं वर्चस्व आबादी ठेवीलच याचा भरोसा नसतो ज्या वेळेला आपल्या पदरात काहीच पडत नाही याची जाणीव होते, त्या वेळेला मागतकऱ्यांची संख्या वाढते.
आपलं ठरलं होतं त्याचं काय आणि ही परिस्थिती विद्यमान पंचवार्षिकच्या शेवटच्या चरणात बहुतांश गावात पाहायला मिळत आहे. मी तुमच्या मागे राहिलो तुमची साथसंगत केली, तुमच्यावर येणारे वार मी झेलले, माझ्या पदरात काय, काही करा मला किती दिवस मिळतील हे महत्त्वाचं नाही, माझं नाव लागू द्या पदाधिकारी म्हणून. जास्त दिवस नाही मिरवता आले तरी माजी पदाधिकारी म्हणून मी आयुष्यभर मिरवेल, तुम्ही शब्द पाळा आणि इच्छा माझी पुरी करा, रात्र थोडी आणि सोंगे जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता काय करायचं हा यक्षप्रश्न बहुतांश गावातील धुरंधरांवरती आला आहे.