पुणे : जिल्हा परिषद घेणार मालमत्तेचा शोध; मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सूचना

पुणे : जिल्हा परिषद घेणार मालमत्तेचा शोध; मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. ग्रामपंचायत, तालुकापातळीवर जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या नावावर असल्याची खातरजमा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

नुकतेच सिंहगडावरील विश्रामगृहाच्या जागेवर हॉटेल सुरू झाल्याचे समोर आले होते. प्रशासनाला ही माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. मात्र, अशा पद्धतीने इतर ठिकाणीदेखील जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा कोणी वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा शोध घेण्याचे जिल्हा परिषदेने ठरवले आहे. केवळ शोधच नाही, तर ती मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावावर आहे किंवा नाही याचीदेखील खातरजमा केली जाणार आहे. तसेच नावावर नसल्यास जिल्हा परिषदेच्या नावावर ती मालमत्ता करण्याची प्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. त्याबाबतची नोंदवही, अभिलेखांचे जतन करण्याच्या सूचना चव्हाण यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी भाडेकरू इमारतीतून बाहेर निघत नसल्याची बाब घडली होती. त्यावर सर्वसाधारण सभेतदेखील मोठी वादळी चर्चा झाली होती. जुन्या इमारतीमध्ये आता नवीन इमारतीमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसारखा विभाग स्थलांतरित करण्यात आला आहे. इतरही काही विभाग स्थलांतरित करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान, जुन्या जिल्हा परिषदेसारख्या तालुक्यातील, गावातील मोक्याच्या जागांवर इतर कुणी हक्क तर सांगत नाही ना, याची खातरजमा आता जिल्हा परिषद करणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news