इंडिया नाव बदलण्यासाठी दुसरी नोटबंदी आणणार का? खासदार प्रतापगढी यांचा सवाल | पुढारी

इंडिया नाव बदलण्यासाठी दुसरी नोटबंदी आणणार का? खासदार प्रतापगढी यांचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंडिया आघाडीला भाजप नेते घाबरले आहेत. त्यामुळेच आघाडीच्या नावावरून वाद घातला जात आहे. इंडिया नाव बदलण्यासाठी दुसरी नोटबंदी आणणार का? देशाच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये इंडिया नाव असून, त्याही बदलणार का? इंडिया आघाडीचे नाव भारत केले, तर भाजपवाले काय करतील? असा सवाल अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला.

जुने नाशिकमधील चौक मंडई येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राज्य विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी डॉ. राजीव वाघमारे, सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्राचे प्रभारी अहमद खान, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, राहुल दिवे, हनिफ बशीर आदी उपस्थित होते.

कोरोना काळात महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने जनतेची सेवा केली. मात्र, सत्तापिपासू भाजपने लोकशाहीची हत्या करत सरकार आणले. हे लुटारूंचे सरकार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ होण्यावर सर्व्हेतून शिक्कामोर्तब होत असल्याचे खा. प्रतापगढी यांनी सांगितले. दरम्यान, मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटलसाठी खा. प्रतापगढी २५ लाख, तर आ. मिर्झा यांनी १५ लाख निधी देण्याची घोषणा केली.

काँग्रेस आणि नाशिकचे जुने नाते : थोरात

नाशिक आणि काँग्रेसचे जुने नाते आहे. पुरोगामी विचारांना ताकद देणारा नाशिक जिल्हा राहिला आहे. बिनविरोध खासदार पाठविणारा नाशिक जिल्हा आहे. यात ते वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपने देशाची दिशा चुकवली असून, लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप राज्य विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button