

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यापासून ते मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमची सुरक्षा व्यवस्था, मतदार यादी, मतदान केंद्रांची तयारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आदी सर्व बाबी तत्काळ पूर्ण ठेवण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 15 फेबुवारीपर्यंत घेणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद व 13 पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेबुवारीपासून सुरू होत असल्याने त्या आधीच या निवडणुका घेण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अल्पकालावधीत उमेदवारी अर्ज, छाननी, माघारी आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आयोगाच्या सूचनांनुसार सर्व यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सविस्तर आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. प्रतिमतदान केंद्र 1 हजार ते 1100 मतदार असावेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करावी. मतदान यंत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित स्ट्राँगरूमची व्यवस्था करावी.
या प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, त्याची छाननी व चिन्ह वाटपाची प्रक्रियावेळेत पूर्ण करावी. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. व्हिडिओग््रााफी सर्व्हेलन्स पथक, भरारी पथक, तपासणी नाके (चेकपोस्ट) व तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी. मतदारांना व्होटर स्लिपचे वितरण करावे. तसेच मतमोजणीसाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.