

वाल्हे: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला आहे. परंतु, त्याबाबत काहीच हालचाल होत नसल्याने इच्छुकांत न्यायालयाने निर्धारित केलेल्या मुदतीत जिल्हा परिषद निवडणूक होईल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद निरा-कोळविहिरे गटात उमटले आहेत. या गटातील राजकीय आघाडीवर शांतताच असल्याचे चित्र आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागासवर्ग महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. या गटावर दीर्घकाळ राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु, 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. हा गट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा सक्रिय झाली आहे. शिवसेना शिंदे गट, भाजपा, शिवसेना उबाठा, मनसे, काँग््रेास आदी पक्षांसह काही अपक्ष देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाकडून निरेच्या सरपंच तेजश्री विराज काकडे, निकिता योगेश ननवरे, कॉंग््रेासकडून पिसुर्टीचे माजी सरपंच सविता राजेंद्र बरकडे, भाजपाकडून भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या पत्नी समाज्ञी सचिन लंबाते, माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सून सानिका अजिंक्य टेकवडे, सीमा संदीप धायगुडे, हेमा उमेश चव्हाण, राधाबाई माने, शिवसेनेकडून भारती अतुल म्हस्के, सुजाता वसंतराव दगडे, तेजश्वीनी गणेश गडदरे, ज्योती सागर भुजबळ हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाकडून देखील चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील मनोमिलनावर बरेच काही अवलंबून आहे.
निरा-कोळविहिरे गटात राष्ट्रवादी काँग््रेासचे अनेक दिग्गज नेते असताना मागील निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी पवार विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या तेजश्री विराज काकडे यांचा पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादी काँग््रेासच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याची परतफेड या निवडणुकीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेासचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटाशेजारील ‘बेलसर-माळशिरस’ गटात मागील काही दिवसांपासून इच्छुकांकडून विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. परंतु, निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात असे कोणतेच उपक्रम, मेळावा कोणत्याच पक्षातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आयोजित करीत नसल्याने या गटात कमालीची शांतता दिसत आहे. या गटात जिल्हा परिषद गटात सद्यःस्थितीत पिसुर्टी गावच्या माजी सरपंच सविता राजेंद्र बरकडे यानी जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. इतर इच्छुकांनी अद्याप प्रचाराला देखील सुरुवात केलेली नाही.