

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती एमआयडीसीतील रुई येथे वास्तव्यास असणाऱ्या युवकावर वार करीत त्याचा खुन केल्याचा प्रकार सोमवारी (दि. १) भर दिवसा घडला. गजानन पवार (वय २८, रा. वसमत, जि. हिंगोली) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मयत तरूणाच्या सख्ख्या मावस भावाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याने खुन केल्याची कबुली दिली आहे.
गजाननच्या मुलाने शाळेतून घरी आल्यावर वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्याने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलीसांना याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतावर आरोपीने ३८ वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी आसपासच्या परीसरातील सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर देखील सुरवातीला तपास लागला नाही. मात्र, अधिक चौकशीत गजानन हा केशकर्तनालयात काम करतो, त्याच्याबरोबर त्याचा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा. वसमत, जि. हिंगोली) हा देखील काम करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्याचबरोबर तो सतत नशेत असतो, असे समजले.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना संतोष सीसीटीव्ही फुटेजमध्ये येथून जाताना दिसला. त्यामुळे पोलीसांनी संशयातून तातडीने सुत्र हलविली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने बारामती बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पथक संतोषला पकडण्यासाठी पाठविले. पोलीस हवालदार राम कानगुडे,अमोल नरुटे आदींच्या पथकाने संतोषला ताबडतोब ताब्यात घेतले आहे.