

पुणे : केवळ मराठी मतांकरिता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. दाऊदशी हातमिळवणी करत हिरव्या झेंड्यांच्या तालावर नाचल्याने मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंपासून दूर गेला आहे.अशी बोचरी टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यात गुरुवारी (दि. 11) केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते यात गृहराज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय मनोमीलनाच्या चर्चेबाबत प्रश्न मंत्री कदम यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, ‘केवळ मराठी मतांकरिता ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबई महापालिकेसह राज्यात सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हितासाठी काहीही केले नाही. त्यामुळे मुंबईत मराठी माणसांचा टक्का 35 वरून अवघ्या 7 टक्यांवर घसरला आहे. आमच्याविरोधात हिंदी भाषाप्रेमी असल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र,आम्ही म्हाडाच्या घरांमध्ये मराठी माणसासाठी आरक्षण ठेवण्याचे धोरण आखत आहोत.’
ते पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच महाविकास आघाडीची स्थापना केली होती, आणि जर त्यांनी हा निर्णय घेतला नसता तर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही एकत्र असते.’
कदम यांनी शिवसेना-भाजप युती कायम राहील असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, पुणे महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून शहरात पक्षाची ताकद वाढवण्यावर त्यांचा भर आहे.
कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधील संघर्षावर बोलताना त्यांनी सांगितले की, ‘सुरुवातीला राज्यमंत्र्यांना काही प्रमाणात संघर्ष करावा लागतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यामुळे त्यांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. अद्याप काही अधिकारांचे वाटप झाले नसले तरी, दोन्ही प्रकारच्या मंत्र्यांमध्ये चांगला समन्वय साधला गेला आहे. तसेच, शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष कधीही ताणला जात नाही, त्यामुळे युती तुटण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी सांगितले.