

बावडा : सध्या बाजारामध्ये पेरूचा भाव प्रति किलो 15 ते 17 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या भावात पिकाचा उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले आहे. (Latest Pune News)
इंदापूर तालुक्यात चालू दशकात पेरू पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये तैवान पिंक वाणाच्या पेरूची लागवड मोठ्या क्षेत्रावर झाली. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून पेरूचे भाव सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ढासळत असल्याने पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पेरू उत्पादकांना सध्या भावातील घसरणीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. साहजिकच पेरूच्या बागा काढून टाकाव्यात की काय या मन:स्थितीमध्ये सध्या अनेक पेरू उत्पादक आहेत.
सध्या पेरूची बाजारामधील वाढलेली आवक व परराज्यातील मोठ्या शहरांमधून पेरूची पावसामुळे कमी झालेली मागणी यामुळे पेरूच्या भावात मोठी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. वडापुरी येथील शेतकरी पांडुरंग मल्हारी देवकर यांनी दीड एकर क्षेत्रावर तैवान पिंक पेरूची लागवड केली. बागेसाठी त्यांना मुलगा प्रदीप देवकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. तीन वर्षांत 6 ते 7 लाख रुपये खर्च झाला. सध्या भाव घसरल्याने साधारणत: 3 लाख रुपयांचे उत्पन्न निघेल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पेरूच्या बागेचा खत व व्यवस्थापन खर्च, फळास प्लॅस्टिक पिशवी बसवणे, काढणी व फोमचा खर्चही भरून निघत नाही, अशी बिकट आर्थिक परिस्थिती सध्या पेरू उत्पादक शेतकर्यांची झाली आहे.
पेरू हा नाशवंत माल असल्याने जास्त दिवस टिकत नाही, असे शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), अभिजित शिंदे (शेटफळ हवेली) यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या तैवान पिंक पेरूच्या भावात निच्चाकी घसरण झालेली असताना दुसर्या बाजूला समाधानाची बाब म्हणजे कमी उत्पन्न देणार्या पांढर्या पेरूस प्रति किलो रु. 35 तर रेड पेरूस रु. 55 असा समाधानकारक भाव मिळत आहे.