

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला येरवडा-कात्रज यादरम्यानचा बोगदा प्रकल्प आता फक्त कागदावरच राहणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, या बोगद्याची उपयुक्तता आणि त्याचा प्रचंड खर्च पाहता प्रकल्प व्यावहारिक नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आम्ही विरोध केला असल्याचे राम यांनी सांगितले. दरम्यान, आयुक्तांच्या स्पष्टोक्तीमुळे सारसबाग ते शनिवारवाडा व शनिवारवाडा ते स्वारगेट यादरम्यान बोगद्याचा प्रकल्प देखील आता कागदावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली. त्यावेळी हा प्रकल्प महापालिकेला करणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले. त्यामुळे येरवडा ते कात्रज या बोगद्याची संकल्पना महापालिकेच्या पातळीवर गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा उत्तर ते दक्षिण भाग जोडण्यासाठी येरवडा ते कात्रज असा बोगदा तयार करण्याचे नियोजन होते.
कोंडीमुक्त रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगद्याची संकल्पना मांडली होती. त्याबाबतचा पीएमआरडीएला अहवाल बनवण्याचेही सांगितले होते. मोनार्क या एजन्सीने या बोगदा प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल सादर केला असून, सुमारे 18-20 किमी लांबीच्या सहा लेन बोगद्याच्या दोन मार्गांसाठीतब्बल 7500 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले होते. परंतु केवळ 20 किमीच्या रस्त्यासाठी एवढा प्रचंड खर्च महापालिकेला परवडणारा नाही, तसेच या मार्गाचा उपयोग अपेक्षेइतका न होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली होती.
या बाबत आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता त्यांनी देखील हा प्रकल्प ‘फिजिबल नाही’ असे स्पष्ट केले. त्यामुळे येरवड-कात्रजसह शहराच्या मध्यवर्ती भागातील सारसबाग-शनिवार वाडा आणि शनिवार वाडा -स्वारगेट या प्रस्तावित बोगद्यांच्या संकल्पनाही आता थंडबस्त्यात जाणार आहेत.आमदार हेमंत रासने यांचा
ड्रीम प्रोजेक्ट राहणार कागदावर
शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शनिवार वाडा ते स्वारगेट अशा दोन स्वतंत्र बोगद्यांची मागणी केली होती. रासने यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. या बाबत पाहणी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले होते.
मात्र, ते शनिवार वाडा परिसरातील वाहतूक कोंडीत अडकून पडले. त्यामुळे ते पाहणी न करताच परतले. याशिवाय शनिवार वाडा ही ‘हेरीटेज’ वास्तू असल्यामुळे 100 मीटर परिसरात खोदकाम किंवा बांधकामास परवानगी नसल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात येणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुमारे 2,500 कोटी खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प देखील रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते कात्रज या 20 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. हा बोगद्याचा प्रकल्प व्यवहार्य नसून खर्चाच्या दृष्टीने देखील परवडणारा नाही.
नवल किशोर राम, महापालिका आयुक्त