

पुणे : विजयादशमीचा मुहूर्त साधून शहरात घर खरेदी वाढू लागली आहे. दरम्यान, ‘गृहलक्ष्मीच्या नावावर नवे घर’ ही संकल्पना शहरांमधून स्थिरावू लागली असून, शहर सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत पुणे आणि पिंपरी शहरात गेल्या 9 महिन्यांत एकूण 10 हजार घरे महिलांच्या नावे खरेदी करण्यात आली आहेत. त्यातून मुद्रांक शुल्कातील एक टक्का सवलतही मिळाली असून, सुमारे 75 कोटी 68 लाख रुपये वाचले आहेत. (Latest Pune News)
नवरात्र आणि दिवाळी या सणांमध्ये सर्वाधिक घर खरेदी होते. त्यातही नवरात्रात महिलांच्या नावावर होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरांत तसेच जिल्हा केंद्रांवर या कालावधीत ‘स्त्री सशक्तीकरण’ या भावनेतून महिलांच्या नावावर घरनोंदणी होत
असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सदनिकेचा खरेदी व्यवहार करताना दस्त नोंदणीवर मुंबई, पुण्यासारख्या शहरांत, मेट्रो शहरांत सात टक्के तर अन्य शहरांत सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास एक टक्का सवलत मिळत असल्याने सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते.
सुरुवातीला या योजनेत महिलांच्या नावे घरखरेदी केल्यास संबंधित महिला ते 15 वर्षे विकू शकत नव्हती. असे घर विकल्यास संबंधित महिलेला 1 टक्का मुद्रांक शुल्क व दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या अटीमुळे घरखरेदीला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 2023 मध्ये राज्य सरकारने ही अट काढून टाकली, त्यामुळे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पुणे शहरात 2023- 24 या आर्थिक वर्षात 9 हजार 569 घरे महिलांच्या नावे करण्यात आली आहेत. यातून 58 कोटी 29 लाख 2 हजार 937 रुपयांची सवलत मिळाली होती. त्यानंतर 2024- 25 या आर्थिक वर्षात यात दीडपटीने वाढ झाली. त्यानुसार 14 हजार 723 महिलांना आपल्या नावार घर करण्याचा मान मिळाला होता. त्यात 96 कोटी 39 लाख 66 हजार 598 रुपयांची एक टक्क्याप्रमाणे मुद्रांक शुल्कात सवलत मिळाली होती. तर यंदाच्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 29 सप्टेंबरपर्यंत 10 हजार 593 महिलांनी स्वतच्या नावावर घरखरेदी केली आहे. त्यातून 75 कोटी 68 लाख रुपयांची बचत झाली आहे. येत्या मार्चअखेरपर्यंत यात मोठी वाढ होण्याची शक्यता असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात किमान दीडपट वाढ होईल, असा अंदाज आहे.
महिलांच्या नावावर घर घेतल्यास राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट मिळते. त्यामुळे कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळतो. शिवाय बँकांकडूनही महिलांसाठी गृहकर्जावर व्याजदर थोडा कमी असतो. त्यामुळे गृह खरेदीच्या व्यवहारात महिलांच्या नावाचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
बांधकाम क्षेत्रातूनही चालना
नवरात्रातील या खरेदीमुळे बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी याच काळात महिलांसाठी विशेष ऑफर्स व सवलती जाहीर केल्या आहेत. काही प्रकल्पांत महिलांच्या नावावर बुकिंग केल्यास अतिरिक्त सुविधाही दिल्या जात असल्याचे दिसून येते.
महिलांच्या नावावर घरखरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळतेच; मात्र गृहलक्ष्मीला मिळणारा मान मोठा आहे
संतोष हिंगाणे, सहनिबंधक, मुद्रांक शुल्क विभाग, पुणे शहर