

खेड : जमिनीच्या वादातून मोठ्या भावाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी मंगळवारी (दि. ३०) सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बाबाजी नामदेव घेवडे (वय ५२), दिलीप नामदेव घेवडे (वय ५८, दोघेही रा. घेवडेवाडी कारेगाव ता आंबेगाव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
या खून खटल्याची माहिती अशी, मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घेवडेवाडी कारेगाव (ता. आंबेगाव) येथे २६ एप्रिल २०१६ मध्ये जमिनीच्या वादातून गणपत नामदेव घेवडे (वय ५८) यांचा बाबाजी घेवडे आणि दिलीप घेवडे या लहान दोघा भावांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. मृताचा मुलगा आणि पत्नीवर देखील कुऱ्हाड, कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मृताची पत्नी हैसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मंचर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. बी. गोडसे यांनी तपास करून दोन्ही आरोपी भावांना ३० एप्रिल २०१६ रोजी अटक केली होती.
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. पी. पोळ यांच्यापुढे सुरू होता. सहायक सरकारी अभियोक्ता विकास देशपांडे, संतोष वाघ यांनी १६ साक्षीदार तपासले. यासह फिर्यादीचे वकील ॲड. हेमंत बगाटे, ॲड. ऋषिकेश पाटील, ॲड. केदार गुरव यांनी २ साक्षीदारांची साक्ष घेतली. सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद आणि फिर्यादीची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायाधीश पोळ यांनी आरोपी बाबाजी घेवडे, दिलीप घेवडे या दोघा भावांना खून प्रकरणी सश्रम जन्मठेप व मयताचा मुलगा, पत्नी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सुनील सोळसकर व कोर्ट अंमलदार महिला पोलिस हवालदार सुनीता बटवाल यांनी काम पाहिले.