

भोर : पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झाल्याची घटना भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावरील शेतकरी सुरेश वाघमारे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घडली आहे. डीएनए तपासणी व रक्त परीक्षण केल्यानंतरच रेडकू रानगव्याचे आहे का, हे निष्पन्न होणार असल्याचे वन विभागाचे वनपाल रोहन इंगवले यांनी सांगितले.
वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकू हे म्हशीसारखे नसून त्याचे स्वरूप रानगव्याप्रमाणे आहे. शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यांतील चमक पाहून हे रेडकू रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट होते. पुणे जिल्ह्यातील ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी अशीच एक घटना मुळशी तालुक्यातील पुण्यानजीकच्या सुस बावधन भागात घडली होती.पाळीव म्हैस व रानगव्याच्या संकरातून जन्मलेले रेडकू म्हणजे एक अत्यंत दुर्मीळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या रेडकांची वाढ, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होत असते.