

येरवडा : वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा परिसरातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहाच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्याने केलेली मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.
हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवणी मागण्यात अखेर मंजुरी मिळाली आहे. यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील अत्यावश्यक बांधकाम व पुनर्बांधणीच्या कामासाठी 14 कोटी 50 लक्ष तसेच येरवडा महिला खुले व मध्यवर्ती खुले कारागृहातील कामांसाठी 1 कोटी 5 लक्ष रुपयाच्या विविध कामांचा समावेश आहे.
मंजूर कामांमध्ये येरवडा महिला खुले कारागृहात 100 महिला बंदींकरिता नवीन बॅरेक बांधकामासाठी अंदाजे 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, येरवडा खुले कारागृहात 200 बंदींकरिता 4 नवीन बॅरेक बांधकामासाठी सुमारे 30 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय, येरवडा खुले कारागृहात आठ नवीन बॅरेक, स्वच्छतागृहे व स्नान ओटे बांधण्यासाठी (जी+च्या 4 इमारती) सुमारे 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासोबतच प्रादेशिक मानसिक रुग्णालय, येरवडा येथील वॉर्डच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 14 कोटी 50 लक्ष रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारून रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार आहे.
या सर्व कामांसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असून, महिला बंदी, कैदी तसेच मानसिक रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत व इतर आवश्यक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील. वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कैदी व सर्व घटकांसाठी हा निर्णय दिलासादायक व महत्त्वाचा ठरणार आहे.
आमदार बापूसाहेब पठारे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि निधीची ठाम मागणी यामुळेच ही कामे मंजूर झाली असून, येत्या काळात या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.