

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेमध्ये (वायसीएम) सध्या 434 परिचारिका कार्यरत आहेत. त्यावर सध्या रुग्णालय प्रशासनाची मदार आहे. वायसीएम रुग्णालयात 475 परिचारिकांची गरज आहे. प्रत्यक्षात येथे 434 परिचारिका कार्यरत आहे. त्यामध्ये आस्थापनेवरील फक्त 140 परिचारिका आहेत.
मानधन तत्त्वावरील आणि न्यायालयात दावा प्रलंबित असलेल्या 129 परिचारिकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय, इतर परिचारिका या खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्याशिवाय, रुग्णालयात मदतनीस म्हणून सुमारे 300 ते 350 वॉर्डबॉय आणि वॉर्डआया काम करीत आहेत, अशी माहिती वायसीएम रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
रुग्णालयामध्ये वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग त्याचप्रमाणे, शस्त्रक्रिया कक्ष अशा विविध ठिकाणी परिचारिकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे रुग्णांना औषधे देणे, रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या मदतीला थांबणे अशी विविध महत्त्वाची कामे परिचारिका करत असतात.
वायसीएम रुग्णालयातील रुग्णसेवेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी रुग्णालयामध्ये गरजेनुसार परिचारिकांची पदे भरणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देखील मिळायला हवा. रुग्णालयात आवश्यकतेनुसार परिचारिकांची संख्या वाढविल्यास रुग्णांना आवश्यक वैद्यकिय उपचारांसाठी खूप मदत होणार आहे.
हेही वाचा