नांदेडकरांच्या घशाला कोरड ; नागरिक पाणीटंचाईने हैराण | पुढारी

नांदेडकरांच्या घशाला कोरड ; नागरिक पाणीटंचाईने हैराण

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला धरणाजवळील नांदेड गाव व परिसरातील पन्नास हजारांवर नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. ’धरण उशाला मात्र कोरड घशाला’ अशी येथील रहिवाशांची अवस्था झाली आहे. बोअरवेलचे तसेच मिळेल तसे पाणी वापरावे लागत असल्याने दूषित पाण्यामुळे नांदेड फाटा, सिंहगड रस्ता परिसरात साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरीकरण झपाट्याने वाढल्याने महापालिकेत गावाचा समावेश करण्यात आला. मात्र, अद्यापही ग्रामपंचायत काळातील पाणी योजनाच अस्तित्वात आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या आहेत. त्यामुळे पाणी योजना कोलमडली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता परिसरातील हजारो रहिवाशांना पाण्याचे कनेक्शनही नाही. या परिसरात मोठमोठ्या सोसायट्यांतील तसेच लोकवस्तीतील लोकांची तहान बोअरवेलच्या पाण्यावर भागवली जात आहे. ग्रामपंचायत काळापासून येथे नळयोजनेचे पाणी मिळत नाही. येथे पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी नसल्याने या भागाला पाणीपुरवठा करता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. नवीन जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित होईपर्यंत जुन्या योजनेच्या जलवाहिन्या बदलून चार इंची जलवाहिन्या टाकाव्यात. तसेच कमी दाबाने पाणी मिळत असलेल्या जलवाहिनीऐवजी दुसर्‍या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले व नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

पुणे : दागिने हिसकावणार्‍या हातात पडल्या बेड्या !

Pune PMPML Bus : ठेकेदारांच्या बसची आता कडक परीक्षा! ‘पीएमपी’चे इंजिनिअर करणार वर्कशॉपची तपासणी

Back to top button