’माळेगाव’चा ऊसदर ’सोमेश्वर’पेक्षा रुपये जास्त

File photo
File photo
Published on
Updated on

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा :  बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन 2022-23 चा अंतिम ऊसदर प्रतिटन 3 हजार 411 रुपये जाहीर करण्यात आला. बुधवारी (दि. 30) संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ही घोषणा केली. हा ऊसदर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यापेक्षा प्रतिटन 61 रुपये जास्तीचा आहे. 'माळेगाव' च्या इतिहासातील हा उच्चांकी दर आहे. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.

'माळेगाव'च्या शेजारच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच 3 हजार 350 रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर केल्याने 'माळेगाव'च्या दराबाबत ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. प्रतिटन 3 हजार 411 रुपये ऊसदर जाहीर झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 'माळेगाव'ने जाहीर केलेला हा ऊसदर कार्यक्षेत्राबाहेरील 'अ' वर्ग सभासदांनादेखील मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेटकेनधारकांना प्रतिटन 3 हजार 101 रुपये ऊसदर देण्याचे धोरण संचालक मंडळाने ठरवले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना अद्यापपर्यंत 'एफआरपी' पोटी 2851 रुपये व कांडे बिलाचे 100 रुपये असे एकूण 2 हजार 951 रुपये प्रतिटन दिले आहेत.

गाळप हंगाम सन 2022-23 मध्ये कारखान्याने एकूण 12 लाख 57 हजार 465 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 11.81 साखर उतार्‍याने 13 लाख 24 हजार 300 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले होते, तर 09 कोटी 57 लाख 75 हजार 900 वीज युनिटची निर्मिती करून 5 कोटी 49 लाख 70 हजार 800 वीज युनिटची विक्री केली आहे. माळेगाव साखर कारखाना हा राज्यातील सहकारातील एक अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, त्याच्या नावलौकिकास साजेसा व कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी ऊसदर जाहीर केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी सभासद, अधिकारी, कामगार आदींनी समाधान व्यक्त केले.

अजितदादांनी शब्द खरा केला
बारामती येथील नागरी सत्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखाना उच्चांकी ऊसदर देईल असे जाहीर केले होते. त्यानुसार अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वात माळेगाव कारखाना प्रगतीची घोडदौड कायम ठेवेल, असे माळेगाव साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी सांगितले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील हा उच्चांकी ऊसदर असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच संचालक मंडळ, सभासद, अधिकारी, कामगार यांच्या सहकार्यामुळे माळेगाव कारखाना यापुढेदेखील सहकारातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जाईल.
                                     बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news