पिंपरी : इंद्रायणीनगर येथील सिंथेटिक ट्रॅकचे काम कासवगतीने

पिंपरी : इंद्रायणीनगर येथील सिंथेटिक ट्रॅकचे काम कासवगतीने

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅथलेटिक्स (मैदानी खेळ) खेळाडूंना सराव करता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
अ‍ॅथलेटिक्समधील धावणे, फेकणे व उड्यांच्या क्रीडा प्रकाराच्या सरावासाठी हे शहरातील एकमेव मैदान आहेत. येथे 400 मीटरचा आठ लेनचा सिंथेटिकची ट्रॅक आहे. अनेक वर्षांपासून वापर होत असल्याने आणि पाऊस व उन्हामुळे जुना ट्रॅक खराब झाला आहे.

वर्षभरापूर्वी जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सुमारे 4 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. क्रीडा स्थापत्य विभागाकडून सुरू असलेले हे काम कासव गतीने सुरू आहे. या कामामुळे खेळाडूंना मैदानात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यांना सराव करता येत नाही. सराव करता येत नसल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. नाईलाजास्तव त्यांना पुणे शहरातील सारस बागजवळील सिंथेटिक ट्रॅकवर सराव करावा लागत आहे. त्यात प्रवाशाला बराच वेळ जात असल्याने मनासारखा सराव करता येत नसल्याचे चित्र आहे. ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्याने पिंपरी-चिंचवड शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा तसेच, पिंपरी-चिंवड शहर स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.

पावसाने उघडीप दिल्यास काम पूर्ण होईल :

वर्षभरापासून हे काम सुरू आहे. सर्व कामे झाले आहेत. केवळ धावपट्टी तसेच, लॉन टेनिस कोर्टवर सिंथेटिक ट्रॅक अंथरण्याचे काम शिल्लक आहे. पावसाळ्याने उघडीप दिल्यानंतर महिन्याभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या क्रीडा स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

काम लवकर पूर्ण करण्याबाबत तीन पत्र दिले

सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू असल्याने तेथे अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंचा सराव बंद आहे. त्याबाबत क्रीडा विभागाकडे तक्रारी येत आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत स्थापत्य क्रीडा विभागास 3 वेळा पत्र दिले आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

साहित्य न आणताच ट्रॅक उखडून टाकला

आवश्यक साहित्य आणल्यानंतरच खराब सिंथेटिक ट्रॅक काढण्याचे काम करायला हवे होते. मात्र, तसे न करता थेट ट्रॅक काढून टाकण्याचे काम ठेकेदाराने केले. आता, साहित्य नसल्याने नवा ट्रॅक टाकता येत नाही. तसेच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास हे काम आणखी महिने दोन महिने अडकून पडू शकते.

खेळाडूंना बसण्याची व्यवस्था नाही

महापालिकेने हे सिंथेटिक मैदान विकसित केले. मात्र, येथे खेळाडूंना बसण्यासाठी व्यवस्थाच नाही. त्यामुळे खेळाडू, पालक, प्रेक्षक व पंचांना उन्हातच उभे राहावे लागते. तसेच, स्पर्धा असताना हर्डल्स, गोळा, थाळी, भाला, बाबू, हातोडा, उंच उडीची गादी व बार आदी आवश्यक साहित्य महापालिकेकडून दिले जात नाही. त्यामुळे स्पर्धा संयोजकांची गैरसोय होते. शुल्क घेऊनही साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड संघाची कामगिरी ढासळली

  • वर्षभर हे मैदान सरावास बंद असल्याने खेळाडूंना सराव करता आला नाही. शहरात 150 राज्य खेळाडू तर, 50 राष्ट्रीय खेळाडू आहेत. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी काहींनी पुण्यात जाऊन सराव केला. मात्र, ते आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही.
  • नियमित सराव नसल्याने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शालेय व जिल्हास्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाची कामगिरी ढासळली. याला जबाबदार कोण?
  • कामास विलंब झाल्याप्रकरणी व खेळाडूंच्या भवितव्याशी खेळणार्‍या महापालिका अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, असे अ‍ॅथलेटिक्सचे आंतरराष्ट्रीय पंच व संघटक चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news