पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरला जाणार्या पालखी सोहळ्यात विविध राज्यांतून आलेले वारकरीही सहभागी होतात. यंदा तेलंगणावरून आलेल्या काही महिला विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास करीत आहेत. पालखी पुण्यात मुक्कामी असताना या महिला वारकर्यांनी शनिवारवाडा आणि इतर ठिकाणांना भेट दिली. पालखी सोहळ्यानिमित्त श्री विठुमाउलीला भेटण्याची संधी मिळते आणि नवी ऊर्जा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रेवता मुंडे, उमा चेदरपटले आणि दयाबाई केंद्रे यांच्यासह विविध महिला वारकरी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करीत असून, काही जणींची ही पहिली वारी आहे, तर काही जणींची दहावी. पण, परराज्यातून आलेल्या या महिलांचा उत्साह खूप दांडगा आहे. एकमेकींना साथ देत या सगळ्या जणी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.
उमा चेदरपटले म्हणाल्या की, आम्ही तेलंगणाहून आलो आहोत. मी बारा वर्षांपासून सोहळ्यात सहभागी होत आहे. खूप आनंदी आहे. श्री विठुमाउलीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत. त्यापेक्षा मोठा आनंद काय असणार. दयाबाई केंद्रे यांनीही आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, माझ्या कुटुंबीयांनी मला पालखीत सहभागी होण्यासाठी खूप पाठिंबा दिला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि विठुमाउलीच्या भक्तीमुळे मी सोहळ्यासाठी येऊ शकले. इतक्या लांबून सोहळ्यासाठी वेळ काढून आलो आहोत. कारण, आमच्या विठुमाउलीची भेट
महत्त्वाची आहे.
हे ही वाचा :