पुणे पूर्व भागात आज वाहतुकीत बदल | पुढारी

पुणे पूर्व भागात आज वाहतुकीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पुण्यातून आज पुढे मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (14 जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. बुधवारी मध्यरात्री दोनपासून पालखी पुणे शहराबाहेर पोहोचेपर्यंत पालखीमार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी मार्ग : भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने मार्गस्थ. श्री तुकाराम महाराज यांचा पालखी मार्ग : नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, ए.डी. कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे.

वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
संत कबीर चौक- बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट (नेहरू रस्ता), सेव्हन लव्ह्ज चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह्ज चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल चौक ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक चौक, महात्मा गांधी रस्ता, रामोशी गेट चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, जांभूळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्ता, रामटेकडी चौक, वैदूवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस, सीरम कंपनी चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड रस्ता.

पर्यायी मार्गाने वळविली वाहतूक
पुणे-सोलापूर रस्त्याने येणार्‍या जड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणार्‍या दिंड्यांमधील वाहनांनी भैरोबा नाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशिन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशिन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे.

हे ही वाचा :

अकरावीचा पहिला भाग भरण्याचा आज अंतिम दिवस

गव्हाच्या साठ्यावर केंद्राचे निर्बंध!

Back to top button