

कसबा पेठ/पुणे: महिला शक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव करण्यासाठी पुण्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ तब्बल चारशेहून अधिक महिलांनी शंखनाद करून विश्वविक्रमांची नोंद केली. हिंदुस्थानातील पहिले विश्वविक्रमी शंखवादकांचे केशव शंखनाद पथकाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हा विश्वविक्रम साकारण्यात आला. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक रेखा साळुंखे, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या संस्थापिका सुमेधा योगेश चिथडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उमा जोशी, क्रीडापटू प्रीती म्हस्के, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या सुषमा नार्वेकर, पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन आदी या वेळी उपस्थित होते. मंजूषा नागपुरे आणि सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते पथकातील बाल महिला वादकाला मेडल घालून विश्वविक्रम झाल्याची घोषणा करण्यात आली.
ओमकाराने शंखवादन विश्वविक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर शंखमंत्राचे पठण देखील करण्यात आले. शंखावर बह्मनाद, सात खंड, अर्धवलय, तुतारी, पूर्णवलय, सुदर्शन चक्र, मुक्तछंद ही सात आवर्तने सादर करण्यात आली. गजानन, श्री दत्त, श्री राम जयराम हे तीन मंत्र घोष देखील शंखावर सादर करण्यात आले. यानंतर सादर झालेली शंख, डमरू आणि संबळाची जुगलबंदी हे उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. अदिती दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. संयोगिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया सराफ यांनी आभार मानले.
महिला समितीकडून चोख नियोजन
या विश्वविक्रमासाठी केशव शंखनाद पथकाने महिला समिती तयार केली होती. त्यामध्ये महिलाप्रमुख शीला गिरमे यांच्यासमवेत विजया कापसे, संगीता रेडे, लीना पंजाबी, शालन चव्हाण, संगीता भिडे, वीणा झिरपे, अनुजा कुलकर्णी, अमृता सागर, अनिता डोमाळे, राखी इंगळे, गायत्री मढीकर, ज्योती संगमनेरकर, वृषाली धोडगे, शीतल नाईक, वैष्णवी सराफ व गार्गी साळुखे यांचा समोवश होता. या समितीने चोख नियोजन केले.
स्त्रियांना यापूर्वी संघर्ष होता. त्यांना सन्मान मिळावा, यासाठी झटणारे अनेक महामानव आणि योगिनी होऊन गेल्या. महिलांनी सक्षम होण्यासाठी केवळ शिक्षित होणे महत्त्वाचे नाही, तर सुशिक्षित होणे गरजेचे आहे. शंखवादन आणि महिला हा विषय पूर्वी नव्हता. आता शंखवादन पथकाच्या माध्यमातून आजच्या आणि पुढच्या पिढीला हे पाहायला मिळणार आहे.
मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका