

पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय भारताच्या भविष्यास आकार देण्यात आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावेल. आजच्या तरुणांसाठी ‘एआय’ हे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले असून, आरोग्यसेवा, शेती, शहरी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेसारख्या अन्य अनेक क्षेत्रांच्या विकासात ते साहाय्यक ठरेल, हे नुकत्याच दिल्लीत झालेल्या ‘एआय समिट’ने सिद्ध केले आहे. त्यामुळे एआय नोकऱ्या काढून घेईल या भीतीतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे मत केंद्र सरकारचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केले.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) येथे शनिवारी संस्थेचा 16 वा पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सेठ बोलत होते. या वेळी चॉईस एएमसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष जैन व ग््रॉण्ट थॉम्पसन एलएलपीचे अंकित चुग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पीआयबीएमचे संस्थापक अध्यक्ष रमणप्रीत यांनी सर्वांचे स्वागत केले.
सेठ म्हणाले, देश 2047 कडे म्हणजे स्वातंत्र्याच्या 100 वर्षांच्या दिशेने वाटचाल करत असताना आजचे तरुण हेच विकसित भारताचे खरे बँड ॲम्बेसेडर आहेत. भारतात 30 वर्षांखालील 60 कोटींहून अधिक तरुण लोकसंख्या आहे, जी देशाची मोठी ताकद आहे. तरुणाइ स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आधीपासूनच नवकल्पना आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.