

Vidyanand Bapat in Electoral Race: पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नव्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे विद्यानंद बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय पक्षांसोबतच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचेही लक्ष असते. आगामी निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असतानाच विद्यानंद बापट यांचे नाव चर्चेत आल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
असीम सरोदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत विद्यानंद बापट यांच्या सामाजिक भूमिकेचा उल्लेख केला आहे. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर बापट यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत सरोदे यांनी त्यांना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत थेट प्रश्न विचारला. त्यामुळे बापट आगामी निवडणुकीत उमेदवारी करणार का, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
''माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा 'विद्यानंद बापट'. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर - - - विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट ने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?''
पुण्यातील गणेशोत्सवाच्या काळात डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली होती. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमधील मोठ्या आवाजाच्या वापरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या भूमिकेमुळे त्यांना विरोधालाही सामोरे जावे लागले. त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटनाही समोर आली होती.
मात्र, या प्रकरणानंतर ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. विशेषतः उत्सवांच्या काळात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या वापराबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली. बापट यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे आणि सामाजिक विषयांवरील स्पष्ट मांडणीमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
लाऊडस्पीकरच्या वापराबाबत विद्यानंद बापट यांनी कठोर भूमिका मांडली. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध असायला हवेत, अशी त्यांची भूमिका आहे. केवळ नियम तयार करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणेही आवश्यक असल्याचे ते सांगतात.
सण-उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांच्या अंमलबजावणीत शिथिलता येऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता आधीच नियोजन करून नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कारवाई करावी, असेही त्यांचे मत आहे.
असीम सरोदे यांच्या पोस्टनंतर विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली असली, तरी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे का, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात बापट यांची भूमिका काय राहते, याकडे पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.