

Pune Ganeshotsav Legal Notice: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी, वायू आणि घनकचरा प्रदूषणासह सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या वतीने प्रशासनातील संबंधित यंत्रणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि त्यांच्या टीमने ही नोटीस पाठवली आहे.
या नोटिशीद्वारे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाला आळा घालणे, सार्वजनिक रस्त्यांवरील मंडपांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणे तसेच पर्यावरणाचे नुकसान रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रादेशिक अधिकाऱ्यांना ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी आणि इतर प्रकारच्या प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका नोटिशीत मांडण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅम्प्लीफायर आणि डीजे साउंड सिस्टीमवर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर लेझर शोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांचाही विचार करून सार्वजनिक ठिकाणी अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषणासंदर्भात न्यायालये आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. रुग्णालये, शाळा आणि न्यायालयांच्या परिसरातील शांतता क्षेत्रांचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सवातील ढोल-ताशा पथकांमुळे मोठ्या प्रमाणात सामूहिक ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे केवळ डीजेवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची सर्व प्रकारच्या मोठ्या आवाजाच्या कार्यक्रमांवर समान अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका अॅड. असीम सरोदे यांनी मांडली आहे.
गणेश मंडप उभारताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग आणि आपत्कालीन वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेने रस्त्यांवरील मंडपांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या मंडपांवर कारवाई करावी. आवश्यक असल्यास अशा मंडपांचे स्थलांतर करावे, अशी मागणी नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या वायू आणि घनकचरा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. CO₂ कॉन्फेटी कॅनन, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्याच्या वापरावर निर्बंध आणण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण नागरिकांना प्रत्यक्ष दिसावे यासाठी रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या नोटिशीवर प्रशासनाने तीन दिवसांच्या आत उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणेविरोधात पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा अॅड. असीम सरोदे यांनी दिला आहे.
उत्सव आणि धार्मिक भावना जपतानाच पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था यांचाही विचार होणे गरजेचे आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.