Wildfire : सिंहगडाच्या जंगलात वणव्यांची मालिका सुरूच

Wildfire : सिंहगडाच्या जंगलात वणव्यांची मालिका सुरूच

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सदाहरित वनराई, घनदाट झाडी व झुडपांचे वरदान लाभलेल्या सिंहगड किल्ल्याच्या सभोवतालच्या जंगलांत वणव्यांची मालिका सुरूच आहे. वणवे लावणार्‍या समाजकंटकांची माहिती देणार्‍यास वन विभागाने पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सिंहगड किल्ला परिसरातील जंगलांना दररोज वणवे लावले जात आहेत. वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचार्‍यांसह सुरक्षारक्षकांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून धावपळ करावी लागत आहे. सोमवारी (दि. 25) एकाच वेळी दुरुपदरा, चांदेवाडी, घेरा सिंहगड अशा तीन ठिकाणच्या जंगलांत भीषण वणवे लागले होते.

सिंहगड वन विभागाचे वन परिमंडलाधिकारी समाधान पाटील यांनी सुरक्षारक्षकांसह वणवे रोखण्यासाठी धाव घेतली. दोन-अडीच तासांत वणवे रोखण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात जंगल जळून भस्मसात झाले होते. जंगलांना वणवे लावणार्‍या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे (भांबुर्डा) वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या देखरेखीखाली वन विभागाने वन अधिनियम कायद्यांतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत. वणवे लावणार्‍या समाजकंटकांची माहिती हॅलो फॉरेस्टच्या हेल्पलाइन क्रमांक 1926 वर देणार्‍यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, तसेच माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

समाजकंटकांपुढे वन विभाग हतबल

सिंहगड परिसरातील डोणजे, अतकरवाडी, खानापूर, मणेरवाडी, घेरा सिंहगडसह पानशेतपर्यंतच्या जंगलातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात वणव्यात भस्मसात झाली आहे. कडक उन्हाळा व जोरदार वार्‍यामुळे वणवे भडकून एकापाठोपाठ एक जंगल खाक होत आहेत. जंगलाच्या सभोवताली जाळरेषा काढूनही समाजकंटक जंगलाच्या मध्यभागी आग लावून पसार होत आहेत. त्यामुळे वन विभाग हतबल झाला आहे. वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. महॅलो फॉरेस्टफ हेल्पलाइनवर माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news