Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान  | पुढारी

Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान 

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यात सध्या मध्य प्रदेश, गुजरात येथून बांबू येत आहेत. मात्र, कृषी विभागाच्या बांबूलागवड योजनेमुळे जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे परराज्यातील बांबूंऐवजी स्थानिक बांबू उपलब्ध होणार आहेत. बांबू विकास महामंडळातर्फे गेल्या तीन वर्षांत सव्वासहा लाख रोपे वितरीत करण्यात आली आहेत. यावर्षीही दोन लाख ६८ हजार ९० रोपांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्षलागवड, फुलशेतीलागवड कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या झाडांच्या प्रजातीमध्ये बांबूचा समावेश करण्यात आला आहे. बांबूचा विकास करणे, बांबूच्या क्षमतेचा पूरेपूर उपयोग आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या योजनेतून बांबूलागवड करण्यासाठी अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे.

या तालुक्यांत प्रतिसाद

संबंधित बातम्या

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी पट्ट्यासह सिन्नर तालुक्यात बांबू लागवडीस प्रतिसाद मिळत आहे.

हे आहेत प्रकार

मानवेल, मानगा, न्यूटन्स आणि तुल्डा या प्रजातींचे बांबू नाशिकमध्ये उत्पादित होत आहेत. त्यापैकी तुल्डा हा प्रकार जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी होत असलेल्या अगरबत्ती उद्योगांसाठी होत आहे.

असा आहे बांबूचा उपयोग

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्र, उद्योग क्षेत्र तसेच आगपेट्या, आइस्क्रीमच्या काड्या यांसारख्या उद्योगांना बांबूचा उपयोग होत आहे. नैताळे, ओझर, पिंपळगाव या ठिकाणी बांबूंचा बाजार भरत असतो.

असा आहे भाव

२५ ते ३० फुटांच्या बांबूला परिपक्व स्थितीत ६०० रुपयांचा दर मिळणार आहे. १०० ते ५०० बांबूचे एक बंडल तयार करण्यात येते.

कोणाला मिळणार लाभ?

योजनेत वैयक्तिक स्वरूपात शेतकयांना एक सईक जमिनीवर लागवड करता येते. धुऱ्यावर ही लागवड करता येणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसह गावातील रोजमजुरांना रोजगार मिळावा म्हणून सुरू करण्यात आली.

अशी असावी शेती

बांबूलागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. व्यावसायिक शेती करावयाची असल्याने या ठिकाणी मुबलक पाणी, त्याची मशागत आणि निंदणी, खुरपणी वेळोवेळी होणेही महत्त्वाचे आहे. डोंगरउतारावरील, सपाट, मध्यम काळी अशी जमीन यासाठी उत्तम समजली जाते.

हेही वाचा :

Back to top button