

वेल्हे: गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने भाताची कापणी रखडली आहे. दुसरीकडे रानडुकरांच्या कळपांचा धुमाकूळ सुरू आहे. हवेली तसेच राजगड तालुक्यात रानडुकरांनी पाचशेहून अधिक हेक्टर क्षेत्रातील भात पिकाची नासाडी केल्याने शेतकरी चिंताग््रास्त झाले आहेत. (Latest Pune News)
पुणे बाह्यवळण (रिंग रोड) रस्त्याच्या कामासाठी ब्लास्टिंग सुरू असल्याने सिंहगडच्या जंगलातील रानडुकरांसह वन्यजीवांचे स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे रानडुकरांसह मोर, लांडोरी असे वन्यजीव भात व इतर खरीप पिकांवर तुटून पडत आहेत.
सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, सिंहगडच्या पश्चिमेला रिंग रोडच्या रस्त्याच्या कामासाठीच्या ब्लास्टिंगमुळे वन्यजीव अन्न-पाण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. यंदा प्रथमच या भागात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रानडुकरे व वन्यजीवांनी पिकांचे नुकसान केल्यास त्याची शासन नियमानुसार संबंधितांना भरपाई दिली जाते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
पानशेत रस्त्यावरील वरदाडे, खरमरी आदी ठिकाणी रिंग रोडचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम, ब्लास्टिंग केले जात आहे. यामुळे होणार्या मोठ्या आवाजामुळे सिंहगडच्या जंगलातील बिबटे, रानडुकरे व वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. बिबटे नागरी वस्त्यांत धाव घेत आहेत. तर रानडुकरे व अन्य वन्यजीव शेतशिवारात शिरून पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सिंहगड पायथ्याच्या मोगरवाडी, खामगाव मावळ येथील लक्ष्मण दारवटकर, दिनकर जानकर, विलास दारवटकर, दत्तात्रय दारवटकर, निवृत्ती गांडले, कैलास दारवटकर, संजय जानकर, श्रीहरी दारवटकर, मारूती दारवटकर, मधुकर दारवटकर, बाबुराव जानकर, हरिभाऊ उत्तेकर, देविदास बेलुसे, ज्ञानोबा डांबले आदी शेतकऱ्यांची तसेच पानशेत जवळील आंबी येथील वसंत निवंगुणे, सोनबा निवंगुणे, विजय पासलकर, पंढरीनाथ निवंगुणे, अनिल पासलकर आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
आंबी येथील शेतकरी नाना निवंगुणे म्हणाले, अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया चालली आहेत. दुसरीकडे रानडुकरे रातोरात पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.