

कात्रज: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग मिळाल्यानंतर आता प्रशासनाने इस्कॉन चौकात सेवा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे जुना कात्रज-कोंढवा रस्ता म्हणजेच कान्हा हॉटेल ते नवीन होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकादरम्यानचा जुना मार्ग पुढील एक महिन्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, स्मारक ते खडी मशीन चौकादरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या परवानगीने कान्हा हॉटेल चौकातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. (Latest Pune News)
पुढील एक महिन्याच्या कालावधीत स्मारक ते खडी मशीन चौकादरम्यान म्हणजेच जुना कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटकरण काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नागरिकांची काही काळ गैरसोय होऊ शकते; मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका, वाहतूक पोलिस आणि आमदार योगेश टिळेकर यांनी केले आहे.
कात्रज कोंढवा रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम कान्हा हॉटेलसमोर सुरु झालेले आहे. चौकातील काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन परिसर कोंडीतून मुक्त होण्यास मदत होईल.
दत्तात्रेय बारवकर, नागरिक
कात्रज-कोंढवा रस्ताच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन होत असल्याने या कामाला गती मिळाली आहे. इस्कॉन चौकातील काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथविभाग, महापालिका