

वाल्हे: मागील आठवड्यापासून केळीच्या बाजारभावात प्रचंड मोठी घसरण होत आहे. यातच मागील आठवड्यापासून अवकाळी वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने जेऊर येथील केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Latest Pune News)
जेऊर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी कुमार धुमाळ यांनी दीड एकर क्षेत्रात 10 महिन्यांपूर्वी मेहनत करून केळी बाग उत्पादित क्षेत्र म्हणून ऐन मोक्यात आणली होती. यात या केळीच्या बागेला रविवार (दि. 26) ते मंगळवार (दि. 28) यादरम्यान झालेल्या जोरदार वादळी पावसाचा तडाखा बसला असून, केळी पडून आडवी झाली आहे.
अवकाळी पावसाने धुमाळ यांच्या दीड एकर केळी बागेतील जवळपास 350 ते 400 ऐन काढणीत आलेल्या झाडांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी कुमार धुमाळ लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीत आलेली केळीबाग आडवी झाल्याने परिश्रमासोबत खर्चीक रकमेचे देखील नुकसान झाले आहे. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती म्हणून पंचनामा होऊन मदत मिळावी, अशी मागणी धुमाळ कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश धायगुडे यांनी या बागेचा पंचनामा केला. या वेळी शेतकरी कुमार धुमाळ, संतोष चोरगे उपस्थित होते.
खर्च आणि उत्पन्नाचा मेळ कसा घालावा?
केळी उत्पादनांसाठी एकरी उत्पादन खर्च दीड ते दोन लाख रुपये येत आहे. प्रत्यक्षात उत्पन्न 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न यातून मिळते. सद्यःस्थितीत केळीला बाजारभाव मिळत नसल्याने खर्च आणि उत्पन्न, याचा कसा मेळ घालायचा? असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे.
केळीबागेला असा लागतोय खर्च
एका रोपाची किंमत 21 रुपये
दीड वर्षाचे पीक असल्याने शेत पूर्णपणे अडकते
वर्षभरात केळीसाठी ठिबक, खत देणे, फवारणी करावी लागते
यासह आजार होऊ नये म्हणून बड इंजेक्शन, स्कर्टटिंग बॅग लावावी लागते
सरासरी लागवडीपासून ते व्यापाऱ्यांच्या गाडीपर्यंत माल पोहचविण्या दरम्यान शेतकऱ्यांना एका झाडामागे 100 ते 130 रुपयांचा खर्च लागतो.