….का पडते दाम्पत्याच्या मधूर संबंधात ठिणगी?

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

अशोक मोराळे

पुणे : मधूर संबंध दुरावले जात असल्याने नवदाम्पत्यामध्ये ठिणगी पडत आहे. जोडीदार समजून घेत नाही, नातेवाइकांचा संसारात हस्तक्षेप वाढत आहे, यांसह अशा अनेक तक्रारी भरोसा सेलकडील महिला सेलकडे वाढत आहेत. तीन महिन्यांत तब्बल 731 प्रकरणे येथे आली असून, उच्चशिक्षित दाम्पत्याचे समुपदेशन करायचे कसे, असा प्रश्न पोलिसांनादेखील पडला आहे.

सव्वादोन महिन्यात भरोसा प्रकरण सेलकडे

अनिता आणि विजय (नावे बदललेली) दोघेही उच्चशिक्षित. दोन महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह झाला. विजय मला वेळ देत नाही, माझे ऐकत नाही, त्याच्या आईचेच ऐकतो, त्याच्याकडून माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. माझी नणंद येथेच राहते, तिच्यामुळे वाद होतो, तो सतत मोबाईलमध्ये व्यग्र असतो असा अनिताचा आरोप.. तर अनिता माझ्या आईचे ऐकत नाही, माझ्या घरच्यांना नीट वागवत नाही, मी माझ्या आई-वडिलांचेच ऐकणार, तिला सोडून द्यावे लागले तरी चालेल, असे विजयचा युक्तिवाद.. या तू-तू मैं..मैं च्या भांडणात अवघ्या सव्वादोन महिन्यांत दोघांचे प्रकरण पोलिसांच्या भरोसा सेलकडील महिला सहायक कक्षात आले आहे.

सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आई-वडील नको, सासू सासरे जवळ नको, त्यांचा हस्तक्षेप तर नकोच-नको, असे वातावरण गेल्या अनेक वर्षांपासून बाळसे धरत असून, आता हे वाद दिवसागणिक विकोपाला पोहचले आहेत. छोट्या-छोट्या कारणांतून काडीमोड होण्याची पुण्यात सर्वाधिक प्रकरणे प्रथम पोलिसांच्या भरोसा सेलकडील महिला सहायक कक्षात येत आहेत. त्याही पुढे जात कुटुंब न्यायालयाकडील तक्रारींची संख्याही वाढत आहे.

समजून घेण्यास पडताहडत कमी

दोघेही एकमेकांना समजून घेण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. दोघांच्याही एकमेकांकडील अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. अशातच नातेवाईक मंडळीकडून त्यांच्या संसारात हस्तक्षेप केला जातोय. त्यातून आणखी संघर्ष विकोपाला पोहचतो आहे. याबाबत महिला सहायक कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे सांगतात, 'लग्न झाल्यानंतर एक ते दीड महिन्यातच वादाला सुरुवात झालेली प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. दिवसेंदिवस अशा तक्रारींचे प्रमाण वाढते आहे. आई-वडिलांचा हस्तक्षेप, सासू-सासरे समजून घेत नाहीत, पत्नीला वाटते नवरा त्याच्या आईचेच ऐकतो, मला किंमत देत नाही, नणंदेचा दोघांच्या संसारात हस्तक्षेप होतो, मुलीला लग्न झाले की सर्व काही आपल्या हातात मिळावे ही अपेक्षा, मोबाईल व संगणकाचा अतिवापर, मुलगा म्हणतो अगोदर माझे-आई वडील, त्यानंतर तू, मी आई-वडिलांचेच ऐकणार, अशी विविध कारणे वादाची असल्याचे दिसून येते.

अपेक्षाभंग होत असल्याने वाद विकोपाला

संसारात सुरुवातीला आई-वडील, सासू सासरे नको ही दोघांची मागणी असली तरी छोट्या-छोट्या गोष्टीत एकमेकांचे वाद विकोपाला जाऊन दोघांत रोज अबोला होतोय. त्यातच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टि्वटर सारख्या माध्यमांतून जवळीक साधणारे मित्र या काळात अधिकच भावनिक आधार देत असल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. नवदाम्पत्यातील सततच्या भांडणामुळे एकमेकांच्या शरीरसुखाचा अपेक्षाभंग होत असल्याचे समुपदेशनादरम्यान समोर आले आहे. दोघांमधील वाढत्या शरीर सुखाच्या अपेक्षादेखील वादाचे कारण असल्याचे निदर्शनास येते. महिला सहायक कक्षाकडे अर्ज करताना वेगळाच अर्ज केला जातो. मात्र, जेव्हा दोघांचे समुपदेशन केले जाते तेव्हा वादाचा मुद्दा वेगळाच असतो.

दरदिवशी सरासरी 10 ते 12 अर्ज

पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडील महिला सहायक कक्षाकडे 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत पती-पत्नीतील कौटुंबिक वादाचे तब्बल 781 तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. सरासरी विचार केला तर प्रत्येक दिवशी दहा ते बारा तक्रारी अर्ज दाखल होत आहेत. अगदी क्षुल्लक कारणातून थेट घटस्फोटापर्यंत पोहचू पाहणारे हे तक्रारी अर्ज आहेत.

भरोसा सेलकडील महिला सहायक कक्षात महिलांच्या तक्रारी सोडविण्याचे काम केले जाते. तक्रार आल्यानंतर दोघांचे समुपदेशन करून त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध कौटुंबिक कारणातून त्यांच्यात कलह निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. नवदाम्पत्याची अशी अनेक प्रकरणे महिला सहायक कक्षात येत आहेत. अनेकदा त्यांच्यातील वादाची कारणे असतात, त्यातूनच वाद विकोपाला गेल्याचे दिसून येते.
                                                    – राजेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

  • तीन महिन्यांत तब्बल 781 तक्रारी अर्ज
  • जोडीदारास समजून घेण्याचा अभाव
  • शरीरसुखाची अपेक्षा पूर्ण होत नसल्याने वाद विकोपाला

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news