

यवत : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकांना अजून वर्षभर कालावधी असतानासुद्धा भाजपने राज्यात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा व विधानसभाप्रमुखांची यादी जाहीर करून एकप्रकारे निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. मात्र, बारामती मतदारसंघात भाजपकडून कोणाला संधी मिळेल, याबाबत मोठी उत्सुकता असून, याकडे बारामती आणि दौंडकरांचे डोळे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात महत्त्वाच्या समजल्या जाणार्या मतदारसंघापैकी एक बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. राज्याचे राजकारण ज्यांच्याभोवती फिरते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा मतदारसंघ असून, त्यांचे होम ग्राउंड देखील आहे.
यापूर्वीची परिस्थिती पाहिली तर भाजपला या ठिकाणी उमेदवार मिळणे देखील कठीण काम असताना मागील दोन निवडणुकांत मात्र भाजप व मित्रपक्षांनी या ठिकाणी लक्षवेधी लढत दिल्याचे दिसून येते. या वेळी देखील भाजपने 'मिशन बारामती' कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. भाजपकडून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना कोण आव्हान देणार? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. या वेळी भाजपकडून 2019 ची निवडणूक लढविलेल्या कांचन कुल, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तथा ठाकरे घराण्याच्या सूनबाई अंकिता पाटील-ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार की भाजप ऐनवेळी नवखा उमेदवार या मतदारसंघात उभा करतोय, हे पाहावे लागणार आहे.
यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता भाजपने ऐनवेळी आणि निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नवख्या उमेदवाराला प्रचार यंत्रणा राबविण्यात कमालीची कसरत करावी लागली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप या वेळी आपला उमेदवार लवकर तयार करण्याची शक्यता असून, या मतदारसंघात भाजपने दोन केंद्रीय मंत्र्यांचे दौरे देखील केले आहेत. यात निर्मला सीतारामन आणि प्रल्हादसिंह पटेल यांचा समावेश आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार म्हणून रासपचे महादेव जानकर यांनी तगडे आव्हान उभे केले होते. यात सुप्रिया सुळे यांचा 70 हजार मतांच्या आसपास विजय झाला होता, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांनी लक्षवेधी लढत दिली होती. या लढतीमध्ये मोठ्या मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या असल्या, तरी निवडणूक काळात अटीतटीची लढत होऊ शकते, असे चित्र मतदारसंघात भाजपने तयार केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीची केंद्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली असून, भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार राहुल कुल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि फडणवीस हे आ. कुल यांच्या माध्यमातून नेमकी काय व्यूहरचना बारामती लोकसभा मतदारसंघासाठी करतात आणि कोणता उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढणार, ते पाहावे लागणार आहे.
हे ही वाचा :