

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिका घनकचरा विभागात शहर स्वच्छतेसाठी सहा कॉम्पॅक्टर, पाच टिप्पर दाखल झाले. त्या वाहनांचे पूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेवक संजय चोपडा, आरिफ शेख, अभिजित खोसे, घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, संत गाडगेबाबा यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. आजही आपण त्यावर काम करीत आहोत. भारत स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून समाजात स्वच्छतेचा संदेश देण्याचा काम झाले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होत असून घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे नगर शहर कचराकुंडी मुक्त झाले. तसेच आता शहर स्वच्छतेसाठी मनपात 6 कॉम्पॅक्टर 5 टिप्पर दाखल झाले असून या माध्यमातून जलद गतीने कचर्याचे संकलन केले जाईल.
मनपा प्रशासनाने नियोजन करून शहरातील कचर्याचे संकलन 100 टक्के झाले पाहिजे, यासाठी नागरिकांनी देखील घंटागाडीतच कचरा टाकावा. महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. आता महापालिकेमध्ये शहर स्वच्छतेसाठी 6 कॉम्पॅक्टर 5 टिप्पर दाखल झाले असून त्याद्वारे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ आणि निरोगी मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा