आजारी पडण्यापूर्वीच काढा ‘शहरी गरीब’ कार्ड ; गैरप्रकार टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय | पुढारी

आजारी पडण्यापूर्वीच काढा ‘शहरी गरीब’ कार्ड ; गैरप्रकार टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रुग्णाला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नातेवाइकांकडून शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी ऐनवेळी धावपळ केली जाते. यामध्ये बरेचदा बनावट कागदपत्रांची तजवीज केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरी गरीब योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महापालिकेने आजारी पडण्यापूर्वीच संबंधित कुटुंबाने योजनेचे कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे.
महापालिका हद्दीमध्ये राहणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत आहे, अशा व्यक्तींसाठी शहरी गरीब योजना सुरू केली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी मनपा हद्दीतील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, कुटुंबातील सदस्यांचे फोटो आणि आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा झोपडपट्टीत राहत असल्यास गवनीची पावती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जमा करणे अनिवार्य आहे. त्यानंतर संबंधित कुटुंबास शहरी गरीब योजनेचे कार्ड दिले जाते. कार्डचा कालावधी एक वर्षाचा असतो.

कार्डचा लाभ मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार कार्डची प्रक्रिया ऑनलाइन केल्यावर मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे महापलिकेने घरातील व्यक्ती रुग्णालयात दाखल होण्याची वाट न पाहता वार्षिक कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू आहे. सेमी-प्रायव्हेट प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणार्‍या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. शहरी गरीब वैद्यकीय योजनेंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटलमधील अंतर्रुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी. जी. एस. एस. मान्य दराने 50% किंवा 100 % हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हृदयरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे.

हे ही  वाचा : 

पुण्यात गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी

मान्सूनच्या पावसावर पडले अंदाजांचे पाणी; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

Back to top button