ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा मिळणार कधी?

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा मिळणार कधी?

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : यवत (ता. दौंड) येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी जवळपास पाच कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला सध्या कुलूप लावले असून, ही बाब खेदजनक म्हणावी लागेल. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा कधी मिळणार, याची प्रतीक्षा गोरगरीब रुग्णांना लागलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यवत येथे वैद्यकीय सेवेच्या सार्वजनिक आरोग्य या भांडवली खर्चातून 4 कोटी 98 लाख रुपयांचा निधी खर्च करून ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठा खर्च करून या ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यातून गोरगरिबांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही राजकीय मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्यात दिली होती.

बदली होऊनही डॉक्टर रुग्णालय सोडेना

शिवाय या केंद्रालगतच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठा सावळागोंधळ आहे. या ठिकाणी एका डॉक्टरने राजकीय आशीर्वादाने आपले बस्तान बसविले आहे. बदली होऊनही तो जात नसल्याने यवत ग्रामीण रुग्णालयामध्ये राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. राजकारणाशी निगडित असलेला डॉक्टर आणि पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून बांधलेले ट्रॉमा सेंटर याची परिसरात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा आता तालुक्यात फोफावत असून, या ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा मिळणार तरी कधी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ट्रॉमा केअर सेंटरला आली अवकळा

सध्या या केंद्राचा परिसर अस्वच्छ झालेला पाहयला मिळत आहे. कोविड महामारीचा अपवाद सोडल्यास सध्या ही इमारत आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत कुलूप लावून धूळखात पडून आहे. कोविड काळात या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. येथे काही कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या या केंद्राच्या इमारतीलगत बंद असलेली रुग्णवाहिका, लाकडाचे ओंढके, वाढलेले गवत, माती पाहयला मिळते. पाच वर्षांच्या कालखंडामध्ये कोविड काळातील दोन वर्षांचा कालावधी सोडल्यास गेले तीन वर्षे या इमारतीमध्ये कुठलीही आरोग्य सेवा देण्यात आलेली नाही. ज्या उद्देशासाठी ही इमारत बांधली, तो उद्देश सफल होताना दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news