पक्ष्यांसाठी घरांच्या आवारात ठेवा पाणी; पक्षिप्रेमींचे नागरिकांना आवाहन | पुढारी

पक्ष्यांसाठी घरांच्या आवारात ठेवा पाणी; पक्षिप्रेमींचे नागरिकांना आवाहन

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या अखेरीस तापमानाने उच्चपातळी गाठली आहे. वाढत्या उन्हामुळे प्राणी व पक्ष्यांची तगमग होत आहे. पाण्यासाठी पक्ष्यांची सध्या भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरी वस्तीमध्ये चिमण्यांसह इतर पाखरांसाठी घरांच्या टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये छोट्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवण्याचे आवाहन पक्षिप्रेमींनी केले आहे.

पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे उपनगर आणि परिसरामध्ये प्राणी-पक्षी व मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मुंढवा नदीपात्रातील जॅकवेल प्रकल्पातून जून्या कालव्यामध्ये पाणी सोडले जात आहे. मात्र, या पाण्यावर प्रक्रिया केली नसल्यामुळे पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी पक्षी व जनावरे पित असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक नळाच्या ठिकाणी साचलेले किंवा कुठेतरी जलवाहिनीच्या लीकेज असलेल्या ठिकाणी पक्षी पाणी पिताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी आपल्या घर परिसरात पक्ष्यांसाठी छोट्याशा भांड्यांमध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी तगमग होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांसाठी घरांच्या गच्चीवर पाण्याची छोटी भांडी भरून ठेवणे आवश्यक आहे.

– अतुल कवडे, पक्षिप्रेमी

हेही वाचा

Back to top button