पुणे : पिरंगुटमध्ये उभारणार सुसज्ज अग्निशमन केंद्र

पुणे : पिरंगुटमध्ये उभारणार सुसज्ज अग्निशमन केंद्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पिरंगुट औद्योगिक क्षेत्रासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अग्निशमन केंद्र उभारणार आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी पीएमआरडीएने गुरुवारी (दि.10) प्रशासकीय मान्यता दिली.

बारा कोटी 40 लाख रुपये खर्च करून एक एकर परिसरात प्रशस्त अग्निशमन केंद्र उभे केले जाणार आहे. मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील एका रासायनिक कंपनीला 7 जून 2021 रोजी आग लागून 15 महिला आणि तीन पुरुष अशा 18 कामगारांचा मृत्यू झाला होता. औद्योगिक पट्ट्यात एकही अग्निशमन केंद्र नसल्याने अग्निशमन केंद्राची आवश्यकता होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वीच मुळशी तालुक्यातील कासारआंबोलीमध्ये चाळीस गुंठे म्हणजेच एक एकर जागेचा अग्निशमन केंद्रासाठी पीएमआरडीएला आगाऊ ताबा दिला होता. त्यानंतर आराखडा तयार करून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते. गुरुवारी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी बारा कोटींच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता दिल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिरंगुट येथे घडलेल्या आगीच्या घटनेनंतर पीएमआरडीएच्या आयुक्तांनी तातडीने अग्निशन केंद्र उभारणीबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार अग्निशमन केंद्र उभारणीबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. याबाबत पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, 'पीएमआरडीएकडून नजीकच्या काळात निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामास सुरवात करण्याचे नियोजन आहे. याशिवाय अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक असणारी अग्निशमन
वाहने आणि उपकरणे यांच्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.'

असे असणार केंद्र

  • पीएमआरडीएचे केंद्र,
  • पार्किंग शेड सुविधा
  • अधिकारी निवासस्थान
  • कर्मचारी निवासस्थाने
  • आवार भिंत, अंतर्गत रस्ते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news