

सुवर्णा चव्हाण
पुणे : स्नेहा आणि अनिकेत यांनी आपल्या प्रेमकहाणीवर आधारित रील्स आणि लग्नाचे रील्स इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड केले. अन्या रील्सवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला... स्नेहा आणि अनिकेत यांच्याप्रमाणेच आता जोडप्यांचा वेडिंग रील्स शूट करून घेण्याकडे कल वाढला असून, छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर हे रील्स शूट करून देत आहेत.
यंदाच्या लग्नसराईत सोशल मीडियावर या रील्सची धूम आहे. हे रील्स जोडप्यांकडून इन्स्टाग्राम अन् फेसबुकवर अपलोड केले जात असून, इतकेच नव्हे तर लग्नासाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना निमंत्रण देण्यासाठीही खास रील्स शूट करून घेतले जात आहेत. सध्या लग्नसराईची सगळीकडे धूम आहे. डिसेंबर ते जूनपर्यंत लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत आणि त्यामुळेच लग्नातील छायाचित्रणासह रील्स शूट करून घेण्यासाठी छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे मागणी वाढली आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ येथूनही लग्नाच्या शूटची कामे छायाचित्रकार- व्हिडीओग्राफर्सना मिळाली आहेत. संपूर्ण टीम कामाला लागली आहे. त्यामुळेच वेडिंग रील्सची चलती असून, विविध गाण्यांवर, थीमनुसार लग्नामध्येच हे दहा ते बारा रील्स शूट करून दिले जात आहेत.
लग्नातील प्रत्येक क्षण रील्समध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला जात असून, रील्सच्या शूटसाठी जोडप्यांकडून खास थीमही ठरवली जात आहे. पुण्यात वेगवेगळ्या लोकेशन्सवर प्री-वेडिंग रील्स शूट होत असून, खासकरून जुने वाडे, निसर्गरम्य ठिकाणी हे रील्स शूट करण्यात येत आहेत. पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले की, लग्नसराईचा सीझन असल्यामुळे छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे लग्नाच्या शूटसाठी बुकिंग आहेच; त्यामध्ये रील्स शूटसाठीही जोडप्यांकडून मोठी मागणी आहे. सात ते दहा मिनिटांच्या वेडिंग फिल्मसह 30 सेकंद ते एक मिनिटाच्या वेडिंग रील्सला मोठा प्रतिसाद आहे.
यंदाच्या लग्नसराईच्या सीझनमध्ये लग्नाच्या शूटसाठी ठिकठिकाणी जात आहोत. साखरपुडा, लग्नाचे मेंदी व हळदी समारंभ, लग्नाचा दिवस अन् रिसेप्शनपर्यंतचे शूट करीतच आहोत. पण, त्यात रील्स तयार करून देण्यासाठी जोडप्यांकडून मागणी होत आहे. खासकरून पारंपरिक पेहरावात रील्स शूट करून देण्याकडे कल असून, त्यानुसार आम्ही रील्स शूट करून देत आहोत.
अनुपम कुलकर्णी, छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर
मराठमोळ्या, केरळी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, बंगाली अशा वेगवेगळ्या पारंपरिक पेहरावात खासकरून रील्स शूट करून घेण्याकडे कल आहे. वधू आणि वर पारंपरिक पेहराव करून रील्स शूट करून घेत असून, या पारंपरिक पेहरावातील रील्सलाही सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.
प्रेमकहाणी, त्यानंतर साखरपुडा, लग्नाचे मेंदी आणि हळदी समारंभ, लग्नाचा दिवस अन् रिसेप्शन...हे आनंदी क्षण टिपले जावेत, यासाठी रील्स शूट घेण्याकडे क्रेझ वाढली आहे. लग्नाचा सोहळा खास व्हावा आणि प्रत्येक क्षण आणि ते आठवणीत राहावेत, यासाठी रील्स तयार करून घेण्यात येत आहेत. या रील्स शूट करून देण्यासाठी छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्स 10 ते 25 हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारत आहेत.