

जळालेल्या कचेरीने दिले प्रचंड मताधिक्य...
गोपाळ चिंतल
भाजपच्या स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते. शहरातील सर्व प्रभागांची व कार्यकर्त्यांची खडान्खडा माहिती. दांडगा जनसंपर्क, पक्षाच्या शहर सरचिटणीसपदासह विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे नेते, 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सातवेळा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा दांडगा अनुभव, अशी गोपाळ चिंतल यांची ओळख. सातपैकी चार निवडणुकांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. भवानी पेठ ते बिबवेवाडी, असा त्यांचा राजकीय प्रवास. तो करताना आठवणीत राहिलेल्या निवडणुकांचा रंजक इतिहास त्यांच्याच शब्दांत...
भवानी पेठेतील वॉर्ड क्रमांक 66 मधून (रामोशी गेट) 1992 मध्ये पक्षाने मला प्रथम संधी दिली, त्या वेळी या वॉर्डातून पक्षाचे कार्यकर्ते जया किराड हेही इच्छुक होते. उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंडखोरी केली. परिणामी, किराड व माझ्या मतांची विभागणी होऊन माझा 164 मतांनी पराभव झाला. किराड यांनी 750 ते 800 मते घेतल्याने काँग्रेसचे शंकर मिठापल्ली विजयी झाले. 1997 च्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा लक्ष्मी बाजार वॉर्डमधून (क्र. 58) मला उमेदवारी दिली. प्रचारादरम्यान दुर्दैवाने या निवडणुकीला अखेरच्या टप्प्यात जातीय वळण लागले. परिणामी, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी रात्रीच्या वेळी विरोधकांनी माझ्या निवडणूक कचेरीला आग लावली. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मला आणि माझ्या पत्नीला जळालेल्या निवडणूक कचेरीत थांबूनच प्रचार करावा लागला. दिवसभर मी व पत्नी सुनीता जळालेल्या कचेरीत थांबून होतो. मतदानासाठी जाणारे मतदार आमच्याकडे पाहून ‘अरे अरे, गोपाळची कचेरी जळाली, गोपाळवर अन्याय झाला,’ असे म्हणत हळहळत होते. त्याच सहानुभूतीच्या भावनेतून त्यांनी धपाधपा मला मते टाकली. त्यामुळे 1584 एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने मी निर्विवादपणे विजयी झालो.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मी कट्टर समर्थक. राजकारणात त्यांच्यामुळेच मी घडलो. नगरसेवकपदाच्या काळात केलेले काम आणि पक्ष बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 2002 च्या निवडणुकीत मला व माझी पत्नी सुनीता हिला भवानी पेठेतून, तर मला बिबवेवाडी गाव (प्रभाग क्र.27) अशा दोन वेगवेगळ्या प्रभागातून लढण्याची संधी पक्षाने दिली. त्या वेळी माझ्यासोबत असलेले चंद्रकांत अमराळे व प्रभाताई मराठे पाच हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकले, तर मी फक्त 57 मतांनी विजयी झालो. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकारी विजय केसकर यांनी पहाटे पाच वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे हितचिंतक व पक्षाचे नेते मतमोजणी कक्षात येऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होते. माझ्यासोबत पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर. पहाटे पाच वाजता विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊनच आम्ही मतमोजणी केंद्राबाहेर पडलो. अटीतटीच्या विजयामुळे कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या निवडणुकीत बबन नागापुरे, उत्तम कदम, नाना जागडे, प्रदीप नागवडे, मदन डांगी, ॲड. कविदास बेलदारे यांनी माझ्यासाठी जिवाचे रान केले.
2007 च्या निवडणुकीत पक्षाने मला पुन्हा बिबवेवाडीतून उमेदवारी दिली. गेल्या वेळची कसर या निवडणुकीत भरून काढून बहुमताने मी विजयी झालो. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘कमल हमारी जान है, इस वॉर्ड की शान है’, ‘एकही हलचल, गोपाळ चिंतल’ अशा घोषणांनी सारा प्रभाग दणाणून सोडला होता. या वातावरणनिर्मितीचा परिणाम निकालात दिसून आला. भाजपची प्रचाराची यंत्रणा केवळ भेळ, भत्त्यावर काम करायची. वॉर्डातील भिंती याच आमचे प्रचारफलक होते. गॅस वेल्डिंगच्या ठिकाणी पडलेला चुना आणून आणि तो भिजवून तयार केलेल्या पांढऱ्या रंगाने या भिंती रंगविल्या जायच्या. रिझर्व्ह करून ठेवलेल्या या भिंतीवर कोपऱ्यात उमेदवाराचे नावही लिहून ठेवले जायचे. मग नंतर काव विकत आणून व केरसुणीच्या सालपटाचे बश तयार करून त्याने या भिंतीवर घोषणांबरोबरच उमेदवाराचे नाव व चिन्ह रंगविले जायचे. विरोधकांची खिल्ली उडविण्यासाठी काही घोषणाही लिहिल्या जायच्या. पूर्वी निवडणुकीला पैसे लागत नव्हते. लोक मते द्यायचे, प्रेम द्यायचे, आशीर्वाद द्यायचे व प्रसंगी पैसेही द्यायचे. मी सात निवडणुका लढलो, पण कधीही पैसे लागले नाहीत. बिबवेवाडीतून तीन निवडणुका लढलो, पण तेथेही कधी पैसा हा फॅक्टरच नव्हता. कारण, पक्षाची प्रचारयंत्रणाच स्वखर्चाने प्रचारासाठी राबायची. पक्षाने मला खूप काही दिले. तीनवेळा भाजप पुणे शहराचा सरचिटणीस होतो, त्या वेळी अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्या ताब्यातच पक्षाची धुरा असायची. पक्षस्थापनेचा सोहळा पाहण्याचे भाग्यही मला लाभले.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)