

प्रभाग क्रमांक : 17 रामटेकडी-वैदूवाडी-माळवाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या भागात आता भाजपने ताकद वाढवली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता बदललेल्या रचनेत रामटेकडी-माळवाडी-वैदूवाडी या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) भाजप शह देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभागानिमित्त हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्याही वर्चस्वाचा कस लागणार आहे.
प्रभागात रामटेकडी, वैदूवाडी परिसराचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तसेच मगरपट्टा चौक ते मगरपट्टा सिटी रस्ता परिसर, भोसले गार्डन, साने गुरुजी रुग्णालय, माळवाडी आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयापर्यंतच्या भागाचा या प्रभागात समावेश आहे. तसेच, रामटेकडी झोपडपट्टी व रामटेकडी औद्योगिक वसाहत देखील याच प्रभागात आहेत. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 92 हजार 842 इतकी आहे. प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) हा प्रभाग अनुकूल बनला आहे. 2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार या प्रभागातून निवडून आले तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे निवडून आले असून, त्यांचे या प्रभागात वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप आणि शिवसेनेचाही (ठाकरे गट) या प्रभागात प्रभाव आहे. यामुळे महायुती आणि महाआघाडी एकत्रित निवडणूक लढविणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची युती होणार का? पॅनेल कसे होणार? हे निश्चित झाल्यावर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण आहे.
या प्रभागात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) अनेक इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत, तर प्रतिस्पर्धी भाजपकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रभागात आमदार चेतन तुपे यांचे वर्चस्व असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपला मानणारा मोठा वर्गही या प्रभागात आहे. यामुळे आमदार चेतन तुपे या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) आनंद आलकुंटे, हेमलता मगर, अशोक कांबळे, रामभाऊ कसबे, अरूण आल्हाट, ईशान तुपे, दत्तात्रय तुपे, प्रदीप मगर, प्रतिभा तुपे हे इच्छुक आहेत. भाजपकडून इम्तियाज मोमीन, अशोक लाकडे, शक्तीसिंग कल्याणी आदींची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीकडून प्रवीण तुपे, प्रशांत तुपे, कुमार ऊर्फ गौरव तुपे, समीर तुपे, तुकाराम शिंदे, खंडू लोंढे, सतीश कसबे, डॉ. किशोर शहाणे हे इच्छुक आहेत.
जुना प्रभाग क्रमांक 22 मध्ये मगरपट्टा-मुंढवा हा भाग समाविष्ट होता. या भागातून चेतन तुपे, हेमलता नीलेश मगर, बंडूतात्या गायकवाड, पूजा कोद्रे हे निवडून आले होते. मात्र, आता प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी-वैदूवाडी-माळवाडी हा प्रभाग नवीन झाला आहे. यात मुंढवा नसल्याने या प्रभागातून माजी नगरसेवक बंडूतात्या गायकवाड आणि पूजा कोद्रे हे निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा आहे. या प्रभागात आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून, यामुळे दिग्गजांची अडचण होऊ शकते. आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलल्याने आगामी निवडणूक रंगतदार होणार आहे.