

मंचर: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलल्याने खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांचे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांची नाराजीची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचा विकास वेगाने होईल, अशी अनेक वर्षे नागरिकांची अपेक्षा होती. आता मार्ग बदलल्याने या तिन्ही तालुक्यांचा मोठा भमनिरास झाला आहे. यामुळे येथील विकासावर थेट परिणाम होणार असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासनाने ही व्यथा गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
रेल्वे या तालुक्यांमधून गेली असती तर दूध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग, दुग्धव्यवसायाशी निगडित प्रक्रिया उद्योग, तसेच लहान-मोठे स्थानिक व्यवसाय यांना मोठी चालना मिळाली असती. मंचर-घोडेगाव-खेड परिसरातील उत्पादनांना पिंपरी-चिंचवड आणि पुणे बाजारपेठेची सहज उपलब्धता निर्माण झाली असती. वाहतुकीचा खर्च, वेळ आणि श्रम कमी झाले असते. त्याचा शेतकरी आणि व्यावसायिकांना थेट आर्थिक फायदा झाला असता.
तिन्ही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि विद्यार्थी वर्ग पुणे, पीसीएमसीमध्ये नोकरी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर करतो. रेल्वेमुळे तो आपल्या गावी राहून दररोज ये-जा करू शकला असता. त्यामुळे निवास, प्रवास व दैनंदिन खर्चाचा मोठा ताण कमी झाला असता. घरातील वयस्कर आई-वडील, शेतीकामे आणि पशुपालनाची काळजी घेणेही त्यांना शक्य झाले असते.
किसनशेठ उंडे, उद्योजक, भागडी
रेल्वेमार्गातील बदलामुळे हा सर्व विकासकाळ रोखला गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि झालेल्या निर्णयाचा योग्य तो पुनर्विचार व्हावा.
नितीन पोखरकर, केळी निर्यातदार, पिंपळगाव