मावळ तालुक्यातील पवना धरणात वाढतोय पाणीसाठा

मावळ तालुक्यातील पवना धरणात वाढतोय पाणीसाठा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी 1 जूनपासून 11.37 टक्के इतकी वाढ झाली असून, सोमवारी (दि. 10) धरण सुमारे 30 टक्के भरले आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे डोंगर व दर्‍यातून ओढे, नाले, धबधबे वाहत आहेत. डोंगरदर्‍यातून आलेले पाणी धरणात जमा होत आहे. गेल्या 24 तासांत 10 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

यावर्षी 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस 627 मिलीमीटर इतका आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 572 मिलीमीटर इतका होता. तर, धरणात आजअखेर 30 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 27.78 टक्के इतका होता. गेल्या 24 तासात पाणी साठ्यात 1.32 टक्के वाढ झाली आहे. 1 जूनपासून पाणी साठ्यात 11.37 टक्के वाढ झाली आहे.

पाऊस लांबल्याने धरणात केवळ 16 टक्के साठा शिल्लक होता. अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अखेर पाणीसाठा वाढू लागला. पाऊस सतत राहिल्यास पवना धरण 15 ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच, पाऊस लांबल्यामुळे होणारी संभाव्य पाणीकपात टळली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news